आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानाच्या नावाखाली कंपन्यांचे भले करू नका, राधाकृष्ण विखे यांची सरकारवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - उसाचेक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याच्या निर्णयाची पारदर्शकता सरकारने समोर आणली पाहिजे. अनुदानाच्या नावाखाली कंपन्यांचे भले करू नका. ठिबक सिंचन कंपन्यांना दर कमी करण्यास भाग पाडा आणि मागील थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा करणार याचा खुलासा करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 
 
राहाता तालुक्यातील ममदापूर येथे विखे यांच्या हस्ते ५० लाख खर्चाच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठिबक सिंचनाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले. उसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्याच्या शासनाचा विचार असेलच, तर या निर्णयातील वास्तवता सरकारने गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज व्यक्त करून विखे म्हणाले, अनुदान शेतकऱ्यांना मिळेल, पण कंपन्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट कोण थांबवणार, सरकार नेमके शेतकऱ्यांचे भले करणार की कंपन्यांचे. 
 
आघाडी सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना जागतिक पातळीवर निविदा बोलावून ठिबक सिंचन संचाचे दर कमी करण्यास कंपन्यांना आपण भाग पाडले होते, असे सांगून विखे म्हणाले, ऊस उत्पादकांना मागील अनेक वर्षांचे अनुदान मिळालेले नाही. नव्याने निर्णय करताना शेतकऱ्यांना त्यावर्षातच अनुदान मिळाले पाहिजे. मागील वर्षाचे अनुदान कधी मिळणार याबाबतही खुलासा करावा. 
 
शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम असून, कर्जाचे पुनर्गठण झालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी येणाऱ्या अधिवेशनात निर्णय करण्यास सरकारला भाग पाडू, असे विखे यांनी सांगितले. 
 
गोदावरी जल आराखड्याबाबत विखे म्हणाले, बक्षी समितीने सादर केलेला आराखडा मुळातच उच्च न्यायालयाच्या आदेशाला छेद देणारा आहे. निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची सोय लावण्यासाठी समित्या नेमून असे अहवाल पुढे आणले जातात. पण ही माणसं सरकारी व्यवस्थेतील असतात. विरोधात ती अहवाल कसा देणार? बिगर सरकारी अधिकारी नेमूनच अहवाल मागवण्याची गरज आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालामुळे गोदावरी खोऱ्याला दीर्घकालिन परिणाम भोगावे लागले. या भागातील शेतीव्यवस्था उद््ध्वस्त झाली. कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबतचा प्राधान्यक्रमच आता भविष्यात असला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...