आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाची नवी नोट पाच रंगांत, आकर्षक रूपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एक रुपयाची नोट हल्ली व्यवहारात फारशी पहायला मिळत नाही. जुन्या नोटा फारशा चलनात राहिल्या नसल्याने रिझर्व्ह बँकेने नव्या रंग, रूपातील एक रुपयाच्या नोटांची छपाई सुरू केली आहे. या नोटा अजून महाराष्ट्रात उपलब्ध झाल्या नसल्या, तरी जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहात त्या दाखल झाल्या आहेत.
एक रुपयाची जुनी नोट फारशी आकर्षक नव्हती. नवी नोट मात्र पाच विविध रंगांची सरमिसळ करून देखणी बनवण्यात आली आहे. मात्र, या नोटेचा आकार पूर्वीपेक्षा लहान आहे. त्यावर रुपयाचे नवे चिन्ह असलेल्या नाण्याचे चित्र आहे. पूर्वीच्या नोटेवर वर्ष लिहिलेले नसे. आता मात्र नोटेवर आणि खालील बाजूस नोट कोणत्या वर्षी छापली याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सध्या या नोटांची छपाई कोलकता येथील प्रतिभूती मुद्रणालयात सुरू आहे. या नोटांसाठी परदेशातून आयात केलेला कागद वापरता देशात तयार झालेलाच कागद वापरण्यात येत आहे. पंधरा भाषांमध्ये त्यावर एक रुपया असे लिहिलेले आहे. वित्त सचिवांची स्वाक्षरी त्यावर आहे.
या नोटा अजून महाराष्ट्रातील बँकांमध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. नव्या नोटा व्यवहारात येण्यासाठी अजून वर्ष लागण्याची शक्यता आहे. जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आलेल्या नाहीत.

जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांनी प्रयत्नपूर्वक एक रुपयाच्या नव्या रंग, रूपातील नोटा कोलकत्याहून मिळवल्या आहेत. सध्या या एक रुपयाच्या नोटेची किंमत संग्राहकांच्या क्षेत्रात २०० रुपये आहे!
सत्तर देशांच्या नोटा
पोपटलाल हळपावत यांच्या संग्रहात सुमारे ७० देशांतील विविध आकार आणि रंगांच्या चलनी नोटा आहेत. यातील काही नोटा सुगंधी आहेत. गुलाब, चंदन, तसेच विविध फुलांचा सुवास या नोटांना येतो. कोलकता मुद्रणालयात छापलेली शंभर रुपयांची नवी नोटही त्यांच्याकडे आहे. या नोटेवरील क्रमांक टेलिस्कोपीक पद्धतीचा म्हणजे आकडे डावीकडे क्रमाने मोठे होत जाणारे आहेत. नकली नोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारतर्फे ही काळजी घेण्यात आली आहे.