आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Design Of Flyover In Nagar Station From Shivsena

स्टेशन रस्त्यावर शिवसेनेचा प्रतिकात्मक उड्डाणपूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सक्कर चौक ते मार्केट यार्डपर्यंतचा उड्डाणपूल अजून कागदावरच असल्याने अपघातांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुधवारी सकाळी सक्कर चौकात प्रतिकात्मक उड्डाणपूल तयार केला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, महिला आघाडीच्या शहर संघटक अर्चना देवळालीकर, निर्मला धुपधरे, मुक्ता मेटे, अनिता देवढे, संगीता ससे आदी उपस्थित होते. नगर-शिरूर रस्ता चौपदरीकरणाच्या कामांतर्गत सक्कर चौक ते मार्केट यार्ड हा उड्डाणपूल समाविष्ट आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. उड्डाणपूल नसल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांना त्यात जीव गमवावा लागला आहे. मागील आठवड्यात आदिती पुंड या शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यू झाला.
या परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसही नसतात. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांची धांदल उडते. उड्डाणपुलामुळे हा प्रश्न सुटणार असून अवजड वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी आमदार अनिल राठोड यांनी मध्यंतरी प्रयत्न केले, पण प्रशासनाकडून प्रत्येक वेळी विविध कारणे पुढे केली जातात. उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊनही एक वर्षे उलटले, तरी देखील प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. पालकमंत्री बबनराव पाचपुते उड्डाणपुलाच्या कामाबाबत नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. मागील महिन्यात सुरू करण्यात आलेली भूसंपादनाची प्रक्रियादेखील थंडावली आहे. बाह्यवळण रस्ता व रेल्वेगेटचा प्रश्न सोडवण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे.
वीजवाहिन्यांचे स्थलांतर - उड्डाणपुलासाठी स्टेशन रस्त्यावरील वीज वाहिन्या व विजेच्या खांबांच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे. या सुमारे अकराशे मीटर अंतरातील तीन भागांतील भूसंपादन पूर्ण झाले असून एका भागातील भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.