नगर - ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाने प्रकाशित केलेल्या सरदार ना. य. मिरीकर लिखित 'अहमदनगर शहराचा इतिहास' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी (१८ जून) होत आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता संग्रहालयात होणाऱ्या या कार्यक्रमास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रा. डॉ. प्र. ल. गावडे, महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. सदाशिव शिवदे, इतिहास संशोधक प्रा. अशोक नेवासकर उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती बरोबर शंभर वर्षांपूर्वी १९१६ मध्ये प्रकाशित झाली होती. नगर शहराच्या इतिहासावरील मराठीतील हे पहिलेच पुस्तक ठरले. (कै.) नानासाहेब मिरीकर यांनी अनेक ग्रंथ अभ्यासून, विविध वास्तूंना भेट देऊन हे पुस्तक लिहिले. ही आवृत्ती दुर्मिळ झाल्याने नानासाहेबांचे पुतणे सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी त्यात भर घालून सुधारित आवृत्ती १९६८ मध्ये प्रकाशित केली. तळटिपा आणि छायाचित्रांचा समावेश या आवृत्तीत करण्यात आला. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे मनोगत या आवृत्तीत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ही आवृत्तीही संपली. या पुस्तकाला अभ्यासकांकडून होत असलेली मागणी लक्षात घेऊन संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांनी नवी आवृत्ती प्रकाशित करण्याचे ठरवले. सरदार बाबासाहेब मिरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे आैचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला. पुस्तकाच्या शतकमहोत्सवी वर्षात ही आवृत्ती प्रकाशित होत आहे.
नव्या आवृत्तीत पुस्तकाचे लेखक नानासाहेब मिरीकर बाबासाहेब मिरीकर यांचा सचित्र परिचय ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांनी करून दिला आहे. नगर परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची रंगीत छायाचित्रे या आवृत्तीत आहेत. ही छायाचित्रे संजय दळवी भूषण देशमुख यांनी काढली आहेत. नगरवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपल्या संग्रही ठेवावे पाहुण्यांना भेट द्यावे, असे हे संग्राह्य पुस्तक आहे. याआधी वस्तुसंग्रहालयाने डी. डी. नगरकर यांचे "ग्लिमसेस ऑफ अहमदनगर' या इंग्रजीतील पुस्तकाची नवी सचित्र आवृत्ती प्रकाशित केली आहे. जिल्हाधिकारी कवडे यांनी या दोन्ही आवृत्त्यांच्या प्रकाशनासाठी आग्रह धरला होता. त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना ते ही पुस्तके आवर्जून भेट देतात. इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे अावाहन संग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर अभीरक्षक संतोष यादव यांनी केले आहे.