आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर, सुपा, पांढरीपूल एमआयडीसीत येणार नवे प्रकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योजक यावेत, यासाठी राज्य सरकार केवळ एका ई-मेलवर उद्योग सुरू करण्याबाबत सर्व सहकार्य करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केल्याने नगरसह सुपा, पांढरीपूल या औद्योगिक वसाहतींत नव्या उद्योगांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.
मुंबईत झालेल्या एचएसबीसी गुंतवणूकदार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ एक ई-मेल केला, तरी उद्योजकांना सर्व सहकार्य केले जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उद्योगजगताने स्वागत केले आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात सहा हजारांहून अधिक उद्योग आहेत. त्यात खासगी व सहकारी साखर कारखान्यांसह लघू, मध्यम, तसेच मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. सध्या नगर शहर, सुपा, श्रीरामपूर, पांढरीपूल येथे बऱ्यापैकी उद्योग आहेत. नगर शहराजवळील नागापूर औद्योगिक वसाहतीत ६०० हून अधिक उद्योग आहेत. त्यात १२ हजार कामगार आहेत. या एमआयडीसीत दरवर्षी एक हजार कोटींहून अधिक उलाढाल होते. मात्र, मागील काही वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव, आर्थिक मंदी, पाण्याचे व विजेचे वाढलेले दर या कारणांमुळे अनेक उद्योग अन्य जिल्ह्यात गेले. काही उद्योग डबघाईस आले आहेत.

नवे सरकार सत्तेवर येताच महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना हाती घेण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना सर्व परवानग्या तातडीने देण्यासाठी कालावधी निश्चित केला. केवळ एक ई-मेलवर उद्योजकांना सुविधा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींत येणाऱ्या नवीन उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुपा (ता. पारनेर) औद्योगिक वसाहतीत जपानी कंपन्या २ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. जपानी कंपन्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे.
जागेचा प्रश्न जटिल

नगरच्या एमआयडीसीत अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, उद्योगासाठी एमआयडीसीकडे जागाच उपलब्ध नसल्याने हे उद्योजक पुणे, चाकण परिसरातील एमआयडीसीत उद्योग घेऊन जात आहेत. एमआयडीसी प्रशासन निंबळक, चास या परिसरातील जागा उद्योगांसाठी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आता फक्त२४ परवाने

औद्योगिक वसाहतीत यापूर्वी एखादा उद्योग सुरू करावयाचा असल्यास त्यासाठी विविध विभागांकडून ७६ परवाने घ्यावे लागत. आता मात्र राज्य सरकार या मंजुऱ्या कमी करण्याच्या प्रयत्नांत असून, आता केवळ उद्योगांसाठी २४ परवाने लागणार आहेत, असे सांगण्यात आले.
उद्योजकांचे हेलपाटे कमी होतील

^मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे उद्योजकांना अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. हा निर्णय क्रांतिकारकच म्हणावा लागेल. त्याचा नक्कीच उद्योजकांना फायदा होईल. पूर्वी कनिष्ठ अधिकारी स्तरावर उद्योजकांना अनेक अडचणी येत. आता ही सुविधा होणार असल्यामुळे उद्योजकांचे एमआयडीसी कार्यालयातील हेलपाटे कमी होतील.'' अशोक सोनवणे, अध्यक्ष, आमी.
नवे उद्योग महाराष्ट्रात येतील

^ई-मेल केल्यास कुणालाही उद्योग उभारण्यासाठी सर्व सुविधा देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. असे जर झाले, तर महाराष्ट्रात निश्चितच नवीन उद्योग येतील. त्याचबरोबर जे उद्योग बंद आहेत त्यांनादेखील चालना मिळेल. एमआयडीसीतील आयटी पार्कमध्ये एकही उद्योग नाही. तेथे उद्योग सुरू व्हावेत.'' हरजितसिंग वधवा, उद्योजक.