आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'स्वच्छ शहर सुंदर शहर'चा नव्या महापौरांचा पुन्हा नारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नूतन महापौर सुरेखा कदम उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी गुरूवारी सकाळी पदभार घेतला. राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेना-भाजपचे नेते कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्याप्रमाणेच नव्या महापौर कदम यांनीदेखील "स्वच्छ शहर, सुंदर शहर'चा पुन्हा संकल्प केला. केंद्र राज्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासगंगा थेट नगरकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबध्द असल्याचे कदम यांनी यावेळी स्पष्ट केले.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर कदम यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अनिल कवडे, माजी आमदार अनिल राठोड, अॅड. अभय आगरकर, शशिकांत गाडे, डॉ. विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांच्यासह सेना- भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेच्या आवारात प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. नंतर महापौर कदम यांनी पदभार स्वीकारला. त्या म्हणाल्या, महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला, याचा मनस्वी आनंद झाला. शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांचे स्वप्न साकार झाले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मार्गदर्शन शिवसेना-भाजप नेत्यांच्या सहकार्याने नगरच्या सर्वांगीण विकासाचा विडा आपण उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रात राज्यात युतीचे सरकार आहे. केंद्र राज्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून नगरकरांपर्यंत विकासाची गंगा आणण्याचा आपला प्रयत्न असेल. "सर्वांसाठी घरे' ही केंद्र शासनाची योजना शहरात प्रभावीपणे राबवण्यात येईल. उपनगरातील प्रमुख रस्त्यांसाठी शासनाकडून विशेष निधी आणून नगरकरांचे "स्वच्छ शहर, संुदर शहरा'चे स्वप्न साकारण्यात येईल, असे महापौर कदम यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्मार्ट सिटी'चे "व्हिजन' देशवासियांसमोर ठेवले आहे. स्मार्ट नगरकरांच्या स्मार्ट नगरला स्मार्ट सिटीची ओळख मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही महापौर कदम यांनी सांिगतले. शहर पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात येईल. पिंपळगाव माळवी येथील महापालिकेच्या जागेवर शहर विकासाला चालना देणारा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचेही नूतन महापौरांनी यावेळी सांगितले.

दुसऱ्या सोमवारी नगरसेविकांची बैठक
नगर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक प्रभागातील अडचणी तातडीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नगरसेविकांची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर कदम यांनी दिली. त्यांच्या या निर्णयामुळे नगरसेविकांना प्रथमच आपल्या प्रभागातील प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे.

खासदारांना डावलले
महापौर कदम यांनी पदभार घेतल्यानंतर खासदार दिलीप गांधी महापौर दालनात आले. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते. वृत्तछायाचित्रकारांना मंत्री कदम यांच्यासह खासदार गांधी यांचा ग्रूप फोटो घ्यायचा होता. परंतु खासदार गांधी येताच मंत्री कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते तेथून बाहेर पडले. त्यामुळे खासदार दिलीप गांधी एकाकी पडल्याचे दिसून आले.

उपमहापौर छिंदम यांना पुष्पगुच्छच नाही...
महापौर कदम यांच्या सत्कार समारंभानंतर मंत्री कदम यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते निघून गेले. त्यानंतर उपमहापौर छिंदम यांनी खासदार गांधी शिवसेनेच्या काही मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. पदभारानंतर छिंदम यांचा सत्कार करण्यासाठी गांधी पुढे आले, परंतु सत्कारासाठी पुष्पगुच्छच नव्हता. अखेर महापौरांच्या दालनातून पुष्पगुच्छ आणून छिंदम यांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...