आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावात कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगावमधील सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार विविध संघटनांतर्फे करण्यात आला. यानिमित्ताने एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी केडगावकरांना मिळाली.

केडगावमधील ज्येष्ठ नागरिक संघटना, पालक संघटना, पेन्शनर्स संघटना यासह विविध संघटनांनी केडगावमधून निवडून आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांचा सत्कार केला. कर्नाटकातील धारवाड विद्यापीठातून पीएच. डी. प्राप्त करताना सुवर्णपदक पटकावल्याबद्दल डॉ. सरिता गुंड यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बबनराव कोतकर होते. यावेळी जयद्रथ खाकाळ, शशिकांत आठरे, ए. डी. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नगरसेवक संजय लोंढे, दिलीप सातपुते, विद्या खैरे, सविता कराळे, सुनीता कांबळे या नवनिर्वाचित नगरसेवकांचा यावेळी गौरव करण्यात आला. यानिमित्त एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणार असल्याने केडगावकरांना या कार्यक्रमाविषयी कमालीची उत्सुकता होती. या नगरसेवकांनी आपसांतील मतभेद विसरण्याचे संकेत देऊन केडगावच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सातपुते म्हणाले, दरवाढ झाल्यानंतर राज्य सरकारने महापालिकांना विशेष निधी देण्याची गरज होती. मात्र, उपनगरांना वंचित ठेवल्याने विकासापासून हा भाग दुर्लक्षित राहिला. मात्र, केडगावचे सर्व नगरसेवक यापुढे पक्षीय मतभेद विसरून सामूहिकपणे केडगावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

केडगावचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे. सुधारित पाणी पुरवठा योजना अजून पूर्ण झालेली नाही. केडगावात चांगले उद्यान नाही, सांस्कृतिक संकुल नाही, क्रीडांगण नाही, याविषयी यावेळी खंत व्यक्त करण्यात आली. राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे डॉ. गुंड यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक माजी सरपंच प्रभाकर गुंड यांनी केले.