आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Tapping Water Connection Come Into Final Phase

नव्या नळजोडांचे काम आले अंतिम टप्प्यात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत साडेतीन हजारापेक्षा अधिक नळजोड देण्याचे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना लवकरच नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणी मिळेल. सुमारे पाऊण लाख नागरिकांचा अनेक वर्षांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.

केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी योजनेचे (फेज १) काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड स्थलांतरीत करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी येणारा तब्बल कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च नागरिकच करत आहेत. नळजोडाचा खर्च कोणी करायचा, असा प्रश्न सुरूवातीला निर्माण झाला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा खर्च नागरिकांनीच करावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला. पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून भरण्याची सवलत नागरिकांना मिळाली. केडगावमध्ये हजार २०० अधिकृत नळजोड आहेत. त्यापैकी साडेचार हजार नागरिकांनी नवीन नळजोडासाठी पैसे भरले आहेत, शिवाय एक हजारपेक्षा अधिक अर्ज नवीन नळजोडासाठी आले आहेत.
आतापर्यंत साडेतीन हजार नागरिकांना नळजोड देण्यात आले आहेत. ओंकारनगर पाण्याच्या टाकीअंतर्गत २६०, तर एकनाथनगर पाण्याच्या टाकी अंतर्गत २०० नळजोड देण्याचे काम बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागात लवकरच नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. काही भागातील नळजोडांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे नळजोडाचे काम पूर्ण होताच केडगाव पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित होईल. केडगाव पाणी योजनेचे अंतिम टप्प्यात आलेले काम केवळ नळजोडांमुळे रखडले होते. नळजोडाचा खर्च नागरिकांनीच करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांना विचारण्यात आले नाही. परस्पर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे योजनेचे पाणी मिळणार असले, तरी त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याची ओरड सुरूवातीला केडगावकरांमध्ये सुरू होती.

घरोघरी जाऊन दिले अर्ज
केडगावपाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी पाठपुरावा केला. नागरिकांनी नळजोडाचे पैसे भरावेत, यासाठी मनपा प्रशासनाने घरोघरी जाऊन अर्ज देण्याचे आदेश दिले. मनपा कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन अर्ज तर दिलेच, शिवाय नळजोडाचे पैसेही गोळा केले. त्यामुळे नळजोडाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पैसे गेले असले, तरी नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.