आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमशाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे विदारक चित्र, जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांची अचानक भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- संगमनेर तालुक्यातील साकूर येथील आश्रमशाळेला जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांनी अचानक भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांची विदारक अवस्था यावेळी त्यांच्यासमोर आली. तेथील छायाचित्रण विखे यांनी पत्रकार परिषदेत दाखवून आश्रमशाळेच्या कारभारावर ताशेरे ओढले. याप्रकरणी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
जिल्ह्यात सुमारे दोनशे आश्रमशाळा असून तेथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा बोजवारा उडाल्याची नेहमीच चर्चा असते. एका लग्नानिमित्त साकूरला गेलेल्या विखे यांनी अचानक आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेला भेट दिली. गाडीला लाल दिवा नसल्याने कोण आले आहे, याबाबत शाळेला कळले नाही. सुमारे अडीचशे ते तीनशे विद्यार्थी तेथे असावेत. या आश्रमशाळेत नववीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. जळालेल्या पोळ्या, पिण्याच्या पाण्याच्या पिंपावर साचलेली धूळ अन् माती पाहून अनेक महिन्यांपासून त्यांची स्वच्छता झाली नसल्याचे दिसत होते. पिण्याच्या पाण्यातही अळ्या होत्या आणि घाण साचली होती. विद्यार्थ्यांसाठी असलेली स्वच्छतागृहे तुंबलेली होती, असे विखे यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांच्या पेट्या वर्गाच्या बाहेर होत्या. यासंदर्भात विद्यार्थ्यांना विचारणा केली असता वर्ग भरला असल्याने त्या बाहेर ठेवल्याचे सांगण्यात आले. ही परिस्थिती पाहिल्यानंतर मन उद्विग्न झाले, असे विखे म्हणाल्या. काही मुलांना जेवणासाठी ताट उपलब्ध नसल्याने एकाच ताटात दोन मुले जेवण करत होती. विद्यार्थ्यांच्या ब्लँकेटला दुर्गंधी सुटलेली होती. शिकवण्यासाठी वापरला जाणारा फळा तुटलेला अस्ताव्यस्त पडलेले साहित्य असे संपूर्ण चित्र अध्यक्ष विखे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

पुराव्यानिशी ही परिस्थिती आदिवासी विकास मंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे विखे यांनी सांगितले. यासंदर्भात सभापती अनुराधा नागवडे म्हणाल्या, एकीकडे ‘मेक इन इंडिया’ उपक्रम राबवून डिजिटल इंडिया आपण म्हणतो. प्रत्यक्षात आश्रमशाळेची अवस्था अतिशय गलिच्छ आहे.
 
मातीत बसवतात मुलांना जेवायला
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी बाहेर मातीवर बसवले जाते. सर्वत्र धूळ आणि अस्वच्छताच आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छताही विद्यार्थ्यांकडूनच करून घेतली जाते. पिण्याच्या पाण्यात कचरा पहायला मिळाला, असेही अध्यक्ष शालिनी विखे यांनी सांगितले.
 
संबंधितांची वेतनवाढ तातडीने थांबवावी
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची विदारक अवस्था पहायला मिळाली. या संपूर्ण अवस्थेचे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. याचे रेकॉर्ड तयार करून आदिवासी विकासमंत्र्यांना सादर केले जाणार आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ तातडीने का थांबवू नये, असा सवाल विखे यांनी केला.
 
बातम्या आणखी आहेत...