आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात नवीन काम नाही; सुरू असलेली कामेही ठप्प, अमरावती महापालिकेतील स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विद्यमान महापौर सुरेखा कदम यांना आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात एकही नवीन विकासकाम सुरू करता आले नाही. त्यांचा बहुतांश वेळ कोर्ट-कचेरी, नगरविकास विभागात पोहोचलेल्या विविध तक्रारअर्जांना उत्तरे देण्यात, तसेच मित्रपक्ष भाजप काही प्रमाणात स्वपक्षातील नाराजी दूर करण्यात खर्च झाला. उर्वरित दीड वर्षाच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागणार असल्याचा महापौरांचा दावा अाहे.
 
मात्र, सरकार दरबारी वर्षभरापासून धूळखात पडून असलेल्या सुमारे साडेचारशे कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली, तरच त्यांचा हा दावा खरा ठरणार आहे; अन्यथा ठप्प पडलेल्या विकासकामांचा मोठा मुद्दा येत्या निवडणुकीत विरोधकांच्या हाती पडणार आहे.
 
महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देत महापौर झालेल्या कदम यांचा एक वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला. रखडलेल्या पाणी योजनेच्या कामाला गती देण्याचा अपवाद वगळता महापौर कदम यांना वर्षभरात एकही नवीन काम सुरू करता आले नाही. त्यांनी घेतलेले सर्वच प्रमुख निर्णय या ना त्या कारणाने कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. नेहरू मार्केट, प्रोफेसर कॉलनी चौक येथील प्रस्तावित व्यापारी संकुल, तसेच नुकतीच मंजूर करण्यात आलेली अमृतच्या १०७ कोटी रुपयांच्या निविदेचा प्रश्न नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. चुकीच्या पध्दतीने प्रीमियमची रक्कम निश्चित केल्याने नगरविकास विभागाने नेहरू मार्केट उभारण्याचा ठराव रद्द केला.
 
प्रोफेसर कॉलनी चौकातील प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या प्रीमियम रकमेबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यात महापौर निवडणूकीपासून सुरू झालेला गटनेत्यांचा वाद त्यानंतर स्थायी समिती सदस्य निवडीचा वाद गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे. नव्याने करण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सदस्य निवडीलादेखील न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे सभापतिपदाची निवडणूकही लांबणीवर पडली आहे. वैयक्तिक महापौर कदम यांच्या विरोधातही विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाकडे अनेक तक्रारींबाबत सुनावण्या सुरू आहेत. या सर्व गोंधळात शहर विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नवीन विकासकामे तर दूरच, सुरू असलेली जुनी विकासकामेदेखील बंद पडली आहेत. महापौर कदम उर्वरित कार्यकाळात या सर्व अडचणींमधून कसा मार्ग काढतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
 
 
विरोधकांसाठी आयते कोलीत
महापालिकेने आतापर्यंत सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचे विविध प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले आहेत. वर्षभरापासून या प्रस्तावांच्या फाईली सरकार दरबारी धूळखात पडून आहेत. महापालिका प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रस्तावांच्या फाईली जागच्या हलल्या नाहीत. एक वर्ष संपलेले असून सत्ताधाऱ्यांना डिसेंबर २०१८ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उर्वरित दीड वर्षाच्या कार्यकाळात विकासकामांना गती मिळाली नाही, तर विरोधकांना आयते कोलीत मिळणार आहे.
 
कमी वेळेत अनेक प्रश्न मार्गी लावले
शहरासाठीमहत्त्वाचीपाणी योजना बंद पडली होती. महापौर झाल्यानंतर या योजनेच्या कामाला प्राधान्य दिले. योजनेच्या कामाला गती दिली, आतापर्यंत मोठे मार्गी लागले आहे. शहरात एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत, दिवाळीपासून हे काम सुरू होईल. कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकचर वाहन खरेदी करण्यात येणार आहे. पिंपळगाव माळवी येथील महापालिकेची जागा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमृत योजनेंतर्गत पाणी योजना सक्षम होणार आहे. अडचणी भरपूर आहेत, कमी वेळेत अनेक प्रश्न मार्गी लावले, उर्वरित कालावधीत अनेक मोठी विकासकामे मार्गी लागणार आहेत.''
- सुरेखा कदम, महापौर
 
वकिलांवर होतोय लाखोंचा खर्च
स्थायी समिती सदस्य निवडीच्या विरोधात जुन्या नवीन अशा सहा याचिका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते सध्या सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात असलेल्या समद खान यांच्या विरोधात दोन याचिका सुरू आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेत्याची वेळेत नेमणूक केल्याप्रकरणीदेखील याचिका सुरू आहे. महापौर कदम यांचे पद रद्द का करू नये, यासाठी विभागीय आयुक्त, नगरविकास विभागाकडे सुनावणी सुरू आहे. हरित लवादासारख्या अनेक याचिका महापालिकेच्या विरोधात सुरू असून वकिलांवरच लाखोंचा खर्च होत आहे.
बातम्या आणखी आहेत...