आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरहजर राहण्याची अरुंधती रॉय यांना मुभा, न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दाखल खटल्यात प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहण्यापासून नागपूर खंडपीठाने साेमवारी सूट दिली. तसेच या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली अाहे.
कथित माओवादी समर्थक प्रा. साईबाबा यांच्या समर्थनार्थ लिहिलेल्या लेखात अरुंधती रॉय यांनी न्यायालयाबद्दल अवमानकारक भाष्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नागपूर खंडपीठाने त्यांना अवमान नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र या नोटिसीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच नकार दिला होता. त्यामुळे रॉय यांना सोमवारी नागपूर खंडपीठात हजर होणे क्रमप्राप्तच होते. त्यानुसार साेमवारी त्या सकाळी दहा वाजताच न्यायालयात येऊन हजर झाल्या होत्या. रॉय यांच्या वतीने अॅड. के. एच. देशपांडे आणि अॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली. ‘यांनी लिहिलेला लेख न्यायालयाचा अवमान करणारा नाही,’ असा दावा त्यांनी केला. या दाव्याच्या समर्थनात त्यांनी काही दाखलेही दिलेत. तथापि, न्यायालयाने मात्र त्यावर असहमती दर्शविली. यासंदर्भातील विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. त्याचप्रमाणे रॉय यांना व्यक्तिश: न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट दिली.