आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ इंच पाऊस, निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभर रात्री तुफान पाऊस पडला. पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे येथे आठ इंच पावसाची नोंद झाली, तर भंडारदरा वाकी परिसरात सात इंच पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे भंडारदरा निळवंडे धरणात वेगाने पाणीसाठा वाढला आहे. शनिवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, तरी धरणाची पातळी वेगाने वाढत आहे.
 
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा पाऊस सुरू आहेे. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत धरण ५७ टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे शनिवारी सकाळी १८९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे धरणात पाण्याची वेगाने आवक होत आहे. धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी सहा हजार ४७४ दशलक्ष घनफूट झाला होता.
 
निळवंडे धरणाचा पाणीसाठाही वाढत आहे. मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. कोतूळजवळ मुळा नदीचा विसर्ग १३ हजार ३७५ क्युसेक होता. हे पाणी धरणात जमा होत आहे. मुळा धरणातही ९००० दशलक्ष घनफुटांहून अधिक पाणीसाठा झाला आहे.
धरणातून विद्युतगृह क्रमांक एक साठी ८४९ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी निळवंडे धरणात जात आहे. निळवंडे धरणातही १२ तासांत २०० दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे. धरणात अाता २१५२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.
 
भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रापैकी घाटघर येथे शनिवारी सकाळी १९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत १६८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पांजरे येथे १९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत १४३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रतनवाडी येथे १८७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तेथे आतापर्यंत १९४३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. भंडारदरा येथे १७४ मिलिमीटर पाऊस, तर एकूण १३६९ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. वाकी येथे १६८ (एकूण ९९८) मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. वाकी धरणातून कृष्णावंतीचा ३६४३ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी निळवंडे धरणात जमा होत आहे. मळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार वृष्टी होत असल्याने धरणातही पाण्याची वेगाने आवक होत आहे. मुळा नदीचा कोतूळ जवळ विसर्ग १३,३७५ क्युसेकच्या दरम्यान होता.
 
मुंबईशी संपर्क तुटला
घोटीयेथील दारणा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने त्याच्यावरील वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कारण पर्यटकांना फक्त पुलापर्यंतच येता येत आहे. त्यापुढे पूल पायी ओलांडून दुसऱ्या वाहनाने भंडारदरा येथे यावे लागत असल्याने पर्यटक भंडारदरा येथे येणे टाळत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...