आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक समजून ग्रामपंचायत फोडली; नगर जिल्ह्यातील घटना, एक चोर ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरजगाव- नगर जिल्ह्यातील मिरजगावमध्ये बँक समजून ग्रामपंचायत कार्यालय फोडण्याच्या प्रयत्नात स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे दिगंबर किसान ससाणे (वटलुज, ता. दौंड) हा चोर सापडला, तर गोंधळाचा फायदा घेऊन धनंजय चंद्रकांत गोंदवळ (यवत) हा चोर पळून गेला.  


गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मिरजगावमधील क्रांती चौकातील ग्राम सचिवालयातील ग्रामपंचायत कार्यालय दोन चोरटे घुसले होते. चोरट्यांनी आपल्याकडील कटावणीने कुलूप तोडले. मात्र, तरीही दार उघडत नव्हते. त्यामुळे चोरट्यांनी या कार्यालयातील जाड काच फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटल्याचा आवाज आल्याने परिसरात असलेल्या तरुणांनी आत जाऊन पाहिले. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. याचा फायदा घेऊन धनंजय गोंदवळ हा दुचाकी घेऊन फरार झाला.


मिरजगाव येथील ग्रामसचिवालयात बँक ऑफ महाराष्ट्र व रुक्मिणी सहकारी बँक आहे. या चोरट्यांचा या बँकांकडेच मोर्चा होता. मात्र, त्यांच्या लक्षात न आल्याने बँक समजून त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. मिरजगावमधील क्रांती चौक  महामार्गावरील सततचा वर्दळीचा परिसर आहे. सचिवालयासामोरील जिल्हा परिषदेच्या शाळेत कीर्तन सुरू होते. मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळावरून कटावणी, टॉमी, पान्हे व स्क्रू ड्रायव्हर असे साहित्य पोलिसांना सापडले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस हेड कॉन्स्टेबल सुरेश बाबर, दत्तात्रय कासार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...