आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरणात 63; तर मुळा धरणामध्ये 40 टक्के पाणीसाठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा- भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरणाचा साठा ६३ टक्क्यांवर गेला आहे. पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे येथेही चांगला पाऊस होत आहे. मुळाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने मुळा धरणाचा पाणीसाठाही ४० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. निळवंडे धरणात वेगाने पाणीसाठा वाढून तो सोमवारी सायंकाळी २७३१ दशलक्ष घनफूट झाला होता.
 
गुरुवारपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर पकडला आहे. रविवारीही त्याचा जोर कायम होता. त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सोमवारी सायंकाळी सहा हजार ९४७ दशलक्ष धनफूट झाला होता. आढळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने धरणात २७७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. रतनवाडी येथे सोमवारी सकाळी ९० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.
 
निळवंडे धरणाचा पाणीसाठाही वाढत आहे. मुळा नदीही दुथडी भरून वाहत आहे. कोतूळ जवळ मुळा नदीचा विसर्ग हजार ७०५ क्युसेक होता. हे पाणी धरणात जमा होत आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा सकाळी १० हजार ३८८ दशलक्ष घनफुटांहून अधिक झाला आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरा धरणात ३३७, निळवंडेत ३४५, मुळा धरणात ८४९, तर आढळा धरणात ५५ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले आहे.
 
भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रापैकी घाटघर येथे सोमवारी सकाळी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत १८६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पांजरे येथे ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथे आतापर्यंत १६१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रतनवाडी येथे ९० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तेथे आतापर्यंत २१६८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
 

रतनवाडी सर्वाधिक पावसाचे ठिकाण
रतनवाडीयेथे पावसाने दोन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. रतनवाडी हे नगर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. पूर्वी हा मान घाटघरकडे होता. आता सर्वाधिक पावसाचे ठिकाण तेथून दहा किलोमीटर अलीकडे सरकले आहे. अर्थात घाटघर आजही जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
बातम्या आणखी आहेत...