आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरदार पटेल यांच्या पोलादी इच्छाशक्तीचे किल्ल्यात दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बेचाळीसच्या‘चले जाव’ आंदोलनात नगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आलेल्या बारा राजबंद्यांना येथून बाहेर पडताच येऊ नये, अशी ब्रिटिश सरकारची इच्छा होती. या नेत्यांच्या अंत्यविधीचे नियोजनही करून ठेवण्यात आले होते. सर्वात वयस्कर असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे आतड्याच्या विकारानं अगदी त्रस्त होते, पण पोलादी इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोठडीतले दिवस सुसह्य केेले. आयुष्यातील सर्वात दीर्घ आणि अखेरचा कारावास सरदार पटेल यांनी जिथे भोगला, त्या कोठडीत त्यांची जयंती सोमवारी (३१ ऑक्टोबर) साजरी करण्यात येणार आहे.
१९४२ च्या लढ्यात ज्या बारा राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं होते, त्यांच्या आठवणी तेव्हाचे जेलर बालकराम मेहता यांनी लिहून ठेवल्या आहेत. अजून अप्रकाशित असलेल्या या बाडात प्रत्येक नेत्याची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्यांच्या दिनक्रमाचे वर्णन आहे.
अतिशय बुद्धिमान असलेल्या सरदार पटेल यांना विनोदबुद्धीची देणगी लाभली होती. त्यांचे विनोदी किस्से आणि गोष्टींमुळे वातावरणातला तणाव कमी होत असे. अतिशय साधी राहणीमान असलेल्या पटेलांचा आहारही अगदी सात्विक होता. शिजवलेल्या भाज्या, दूध, दही, लोणी त्यांच्या जेवणात असे. सुरूवातीला ते स्वत:च्या देखरेखीखाली द्रवरूप अन्न शिजवून घेत. नंतर तुकाराम नावाच्या शिपायाने ही जबाबदारी स्वीकारली. मोसंबीचा रस ते रोज घेत. ‘दलिया’ हा त्यांचा आवडता पदार्थ होता.

असह्य पोटदुखीने वल्लभभाईं त्रस्त होते. अनेक दिवस त्यांना पलंगावर पडून रहावे लागे, पण या आजारपणाचे कारण पुढे करून त्यांनी कधी ब्रिटिशांकडे सवलत मागितली नाही की, सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

सरदार पटेल यांचा मुलगा आणि मुलगीही तेव्हा अन्य ठिकाणच्या तुरुंगात होते. वल्लभभाई त्यांना पत्र लिहीत. मुलीकडून लवकर उत्तर आलं नाही, की त्यांना काळजी वाटू लागे.
अन्य राजबंद्यांप्रमाणे सरदार पटेल यांनी नगरच्या किल्ल्यात ग्रंथलेखन केले नाही. तथापि, इथे असताना त्यांनी भरपूर वाचन आणि चिंतन केले. त्यांची खोली एका कोपऱ्यात होती, पण ते तिथं अगदी कमी काळ असत. डॉ. पट्टाभि सीतारामय्या यांच्या खोलीत त्यांचा जास्त वेळ जाई. ब्रिज आणि चौपट नावाचा खेळ ते खेळत.

सकाळी सहा वाजता उठल्यावर कोठड्यांसमोरच्या पटांगणात सरदार पटेल फेऱ्या मारत. नंतर पंडित नेहरूंना बागकामात ते मदत करत, असं जेलर बालकराम यांनी लिहून ठेवले आहे.

नगरकर वाघाला भीत नाहीत...
असेंब्ली निवडणुकीच्या वेळी सरदार पटेल काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष होते. २० जानेवारी १९३७ रोजी ते निवडणूक प्रचारासाठी नगरला आले होते. दाणेडबरा येथे झालेल्या भाषणात ते म्हणाले, सर्वांनी इंग्रज सरकारशी सामना करायला सिद्ध असले पाहिजे. तुम्हाला तुरुंगाची भीती नाही. नगरकर वाघालाही भीत नाहीत हे मी जाणून आहे. पण वाघापेक्षाही जंतू फार त्रासदायक असतात. या जंतुरूपी इंग्रज सरकारला सांगा, निष्कारण गुणगुण करू नका... आम्ही काँग्रेसलाच मते देणार!

सकाळी वाजता किल्ल्यात आदरांजली
भारताचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधानपद भूषवणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून व्यापक प्रमाणात साजरी करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. इतिहासप्रेमी नगरकर चैतन्य फाउंडेशनच्या वतीने सोमवारी सकाळी वाजता भुईकोट किल्ल्यातील नेता कक्षाजवळील सरदार पटेल यांच्या खोलीतील प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करण्यात येईल. नागरिकांना यानिमित्ताने किल्लाही पाहता येईल, अशी माहिती अनंत देसाई यांनी रविवारी दिली.
बातम्या आणखी आहेत...