आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची प्रतिष्ठा लागणार पणाला, पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-भाजपमध्ये लढतीची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अाहे. काँग्रेस विरुध्द भाजप अशी लढत होणार असली, तरी राष्ट्रवादीने उमेदवार देण्याचे निश्चित केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शिवसेना-भाजपत युतीबाबत अद्यापि निर्णय झाला नसला, तरी भाजपने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराचे नाव जाहीर करून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप उमेदवाराच्या विजयासाठी जिल्ह्यातील एक मंत्री, एक खासदार आणि पाच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागेल. 
 
नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुदत डिसेंबरला संपली. निवडणुकीची आचारसंहिता बुधवारपासून लागू झाली. फेब्रुवारीला मतदान होणार अाहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. १९८६ मध्ये प्रा. ना. सं. फरांदे हे आमदार झाले. सलग दुसऱ्यांदा ते निवडून झाले. त्यानंतर भाजपचे प्रतापदादा सोनवणे दोनदा निवडून आले. २०१० मध्ये भाजप-सेना युतीचे प्रा. सुहास फरांदे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांच्यात लढत झाली. भाजपचे वर्चस्व मोडून डॉ. तांबे निवडून आले. डॉ. तांबे यांनी पहिल्याच टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरुवात केली होती. भाजपकडून मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे उमेदवार म्हणून प्रा. सुहास फरांदे यांनी अर्ज दाखल केला होता. 

गेल्यावेळी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासाठी अर्ज दाखल करण्यास झालेला विलंब लक्षात घेता भाजपने यावेळी अडीच महिने अगोदर डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे जवळचे नातेवाईक असलेले डॉ. पाटील प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी गेल्या अडीच महिन्यांत तीन वेळा नगरला भेटी देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तसेच बैठका घेतल्या. 

गेल्या वेळी हातातून गेलेला हा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसकडून पुन्हा डॉ. तांबे यांचेच नाव जवळपास निश्चित झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने त्यांचे नाव निश्चित केल्याचे समजते. निवडणूक जाहीर होण्याच्या वर्षभर आधीपासून डॉ. तांबे यांनी प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचार सुरू केला होता. भेटीगाठीच्या त्यांच्या आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादीने या जागेचा आग्रह धरल्याने आता संभ्रम वाढला आहे. राष्ट्रवादीकडून विद्यार्थी संघटनेचे नेते संग्राम कोते यांचे नाव पुढे आले आहे. कोते हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
यापूर्वीच्या निवडणुकीत डॉ. तांबे यांच्याबरोबर राष्ट्रवादी होता. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने एकला चलो रेचा नारा दिल्याने काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकनंतर सर्वाधिक पदवीधर मतदार नगर जिल्ह्यात असल्याने नगर जिल्ह्यातील वोट बँक निर्णायक भूमिका बजावणार आहे. नगर जिल्हात भाजपचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत निवडून आलेले ७० नगरसेवक तीन नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा भाजपच्या उमेदवारासाठी पणाला लागणार आहे. 
 
आैरंगाबाद बदल्यात नगरला मदत करा... 
विधान परिषदेच्या आैरंगाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांना काँग्रेस मदत करणार आहे. त्याबदल्यात नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मदत करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

नगर जिल्ह्यात ८७ हजार मतदार 
नाशिक जिल्ह्यानंतर सर्वाधिक पदवीधर मतदार नगर जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यात लाख, तर नगर जिल्ह्यात ८७ हजार पदवीधर मतदार आहेत. उर्वरित मतदार धुळे, जळगाव नंदुरबार जिल्ह्यात आहेत. नगर जिल्ह्यात संगमनेर नगर शहरात पदवीधरची संख्या मोठी आहे. 
बातम्या आणखी आहेत...