आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात फुलणार उद्यान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अहमदनगर शहराची ओळख बनलेल्या चांदबिबी महाल (सलाबतखान मकबरा) परिसरात उद्यान विकसित करण्यात येणार अाहे. या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच भारतीय पुरातत्व विभागाच्या उद्यान विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू होईल. 

भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने १६ एप्रिलपासून स्वच्छता अभियान पंधरवडा राबवला जात असून त्याअंतर्गत गुरूवारी सकाळी शहरापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर नगर-पाथर्डी रस्त्यावर असलेल्या चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पुरातत्व विभागाचे अहमदनगर उपमंडलाचे अधिकारी एम. पी. पवार यांच्यासह विभागाचे कर्मचारी इतिहासप्रेमी नागरिक यात सहभागी झाले. 

महालाच्या परिसरात सध्या खिरणीची अतिशय जुनी झाडे असून एवढ्या संख्येने केवळ येथेच ही झाडे पहावयास मिळतात. या झाडांची निगा राखून त्याभोवतीचे पार दुरूस्त करण्याबरोबरच महालाच्या चहुबाजूने आकर्षक उद्यान तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. पाइपलाइन टाकून डोंगरावर पाणी आणण्यात आले असल्याने उद्यानासाठी त्याचा उपयोग होईल. लवकरच पुरातत्व विभागाच्या उद्यान विभागाच्या वतीने उद्यानाचा आराखडा तयार करून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाईल. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक स्वच्छतागृहही बांधण्यात येणार आहे. 

ताजमहाल, तसेच देशातील अन्य महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात पुरातत्वच्या उद्यान विभागाने हिरवाई तयार केली आहे. याच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चांदबिबी महालाच्या उद्यानाचे काम होणार आहे. त्यामुळे या वास्तूच्या मूळच्या सौंदर्यात मोठी भर पडेल, असे पवार यांनी सांगितले. १५८० मध्ये बांधण्यात आलेल्या या वास्तुच्या भिंतींवर केमिकल टीट्रमेंट करून त्या स्वच्छ करण्यात आल्या. छताला वॉटरप्रूफिंग करण्यात आले. तथापि, काही विघ्नसंतोषी मंडळी पुन्हा भिंती छत खराब करतात, असे आढळून आले. या परिसरात अस्वच्छता करणाऱ्या नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

स्वच्छता मोहिमेत पवार यांच्यासह रत्नेश कुमार, संदीप हापसे, करिम शेख, जगदीश माळी, सतीश भुसारी, सतीश सोळंकी, शिवाजी गायकवाड, स्वामी, प्रसाद आळकुटे आदी सहभागी झाले. शुक्रवारी (२८ एप्रिल) सकाळी फराहबख्क्ष महालात स्वच्छता मोहीम आहे. 

माहिती फलक 
चांदबिबीमहाल (सलाबतखान मकबरा), तसेच फराहबख्क्ष महाल बागरोजा येथे त्या त्या वास्तूची माहिती देणारे फलक उभारण्यात आले आहेत. हे फलक मराठी, हिंदी इंग्रजी भाषेत असल्यामुळे तेथे येणाऱ्या देश विदेशांतील पर्यटकांची सोय झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...