आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आक्रमक; चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपी शोधा, अन्यथा सेनास्टाईल आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अडीचवर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून बलात्कार करून तिला बेवारस टाकून देणाऱ्या आरोपीचा तपास अजूनही लागलेला नाही. कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. दोन तपास पथकेही आरोपीचा शोध घेत आहेत, तरीही आरोपी सापडत नसल्यामुळे शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली आहे. महापौर सुरेखा कदम यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या सदस्यांनी पोलिस अधीक्षक रेल्वे पोलिसांना भेटून निवेदन दिले. आरोपीचा शोध लागला नाही, तर सेनास्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

केडगाव एमआयडीसी परिसरात मागील शुक्रवारी सकाळी एक चिमुरडी जखमी अवस्थेत पडली असल्याचे कोतवाली पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी स्वत:हून फिर्याद नोंदवून घेत तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी मुलीचे आई-वडील कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. तथापि, तोपर्यंत अत्याचार झालेल्या मुलीला पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. कोतवाली पोलिसांना तपासाच्या सूचना करून दोन वेगवेगळी तपास पथके आरोपीच्या शोधासाठी तैनात केली गेली. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनानुसार कोतवाली पोलिसांनी आरोपीचे संशयित रेखाचित्र जारी केले. मात्र, त्यापलीकडे आरोपीविषयी काहीही ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिस हवालदिल झाले अाहेत.

मंगळवारी दुपारी महापौर सुरेखा कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिस अधीक्षकंना भेटून चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाचा तपास वेगाने करण्याचे, तसेच आरोपीच्या मुसक्या लवकरात लवकर आवळण्याची मागणी केली. पोलिस अधीक्षकांनी तपासातील प्रगतीची माहिती देत सहकार्य करण्याचे आवाहन केले. आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, मनपा स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव, सभागृहनेते अनिल शिंदे, नगरसेवक अनिल बोरुडे, दिगंबर ढवण, दिलीप सातपुते, सुरेश तिवारी, आशा निंबाळकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देताना माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, आरिफ शेख, सुरेश बनसोडे, अविनाश घुले, अभिजित खोसे, अरविंद शिंदे, सुरेखा कडूस, साधना बोरुडे, शारदा जगदाळे उपस्थित होते.

दोषींना निलंबित करा
महापौरांच्यानेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीने रेल्वे पोलिस ठाणे गाठले. अधिकाऱ्यांवर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालक रेल्वे पोलिस चौकीत गेले होते. त्यावेळीच जर शोध घेतला असता, तर घटना टळली असती, असा आरोप आघाडीने केला. याप्रकरणी चौकीतील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली.

‘निर्भया’तून मदत करा
चिमुरडीवरअत्याचार करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावावा, त्याला कठोर शासन करावे, पीडितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने निर्भया योजनेतून त्यांना मदत करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली. आरोपीचा शोध लागला नाही, तर सेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...