आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांचे बालपण हरवले परीक्षांच्या तणावात..., प्रज्ञाशोधच्या नावाखाली घेतल्या जातात परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रज्ञाशोध परीक्षा सुरू होण्यास विलंब झाल्याने दूरवरून आलेले विद्यार्थी जेवायला बसले. - Divya Marathi
प्रज्ञाशोध परीक्षा सुरू होण्यास विलंब झाल्याने दूरवरून आलेले विद्यार्थी जेवायला बसले.
नगर - शालेय विद्यार्थ्यांचा हसतखेळत आनंददायी पद्धतीने अध्ययन करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी अवांतर, खासगी नियमबाह्य असणाऱ्या स्पर्धा परीक्षांवर बंदी घालण्यात आली. तथापि, नगर जिल्ह्यात रविवारी क्षितीजा प्रकाशनच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचे नियोजन मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोलमडले. नियोजित वेळेत परीक्षा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल झाले. फेब्रुवारी, मार्च महिना विविध संस्थांच्या खासगी स्पर्धा परीक्षांचा हंगाम असतो. एक दिवसाच्या परीक्षेसाठी वर्षभर विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. सराव परीक्षांच्या गोंडस नावाखाली बालपण हिरावून घेण्याचा प्रकार पालक आणि संयोजकांकडून सुरू आहे. 
 
प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा विकास साधताना अध्ययन कौशल्य ओळखण्यासाठी शिक्षकांकडून अनेक निकष लावले जातात. विद्यार्थ्यांवर पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर परीक्षांचा ताण येत असल्याचे शासनाच्या लक्षात आले. काही खासगी संस्थांमार्फत नियमांना हरताळ फासून प्रज्ञाशोध परीक्षा घेण्याचा धंदा चालवला जातो. पालक आणि काहीवेळा शाळाही मुलांना अशा परीक्षांना बसायला लावतात. याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होण्याची शक्यता असते. या अवांतर खासगी परीक्षांसाठी पालकांकडून शुल्क आकारले जाते. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्यासाठी खासगी क्लासेसचा धंदा चांगलाच फोफावला आहे. 
 
आनंददायी शिक्षण पद्धती कायम राहावी विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण पद्धतीचा ताण निर्माण होऊ नये, यासाठी नियमबाह्य परीक्षांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायद्याचा आधार घेत कारवाईचे संकेत दिले. तथापि, जिल्ह्यात क्षितीजा प्रकाशनामार्फत सावित्रबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शहरी ग्रामीण भागासाठी या परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यासाठी १५० ते ३०० रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारले जाते. 
रविवारी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आली. बारा ही पेपर सुरू होण्याची वेळ होती. तथापि, सनफार्मा विद्यालयाच्या केंद्रावर प्रश्नपत्रिका साडेबाराच्या सुमारास पोहोचली. पाऊण वाजता परीक्षेला सुरुवात झाली. दरवर्षी या परीक्षेला हजारो विद्यार्थी बसतात, परंतु परीक्षेचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याने लहान विद्यार्थ्यांचे हाल होतात. या प्रकारामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 
 
परीक्षांंमुळे तणाव वाढतोय... 
सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. विविध खासगी संस्थांनी परीक्षांच्या नावाखाली धंदाच सुरू केल्याचे चित्र आहे. परीक्षा घेण्यामागे मोठे अर्थशास्र असल्याचे मानले जात आहे. या परीक्षांत यश मिळवण्यासाठी पालक वर्षभर मुलांना क्लासला पाठवतात. त्यामुळे क्लासचा धंदाही जोरात
सुरू आहे. 
 
आनंददायी शिक्षण पद्धतीला हरताळ 
रविवारी होळीचा मोठा सण होता. विद्यार्थ्यांना मात्र सणाचा आनंद लुटता आला नाही. संयोजकांनी सणाच्या दिवशीच परीक्षेचे आयोजन करून अानंददायी शिक्षण संकल्पनेला हरताळ फासला. शिक्षण विभागाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून करण्यात आली. 
 
दलालांचा धंदा फोफावला... 
काही संयोजकांकडून शाळांमधील शिक्षकांना, तसेच व्यवस्थापनालाच हाताशी धरून अशा परीक्षांचे नियोजन आखले जाते. त्यासाठी दलाली दिली जात असल्याचा संशय काही पालकांनी व्यक्त केला. या परीक्षांचा दर्जा वाईट असून प्रश्नपत्रिकांमध्येही चुका असल्याचे पालकांनी सांगितले. 
 
अशा परीक्षांना परवानगी नाही 
- खासगी प्रज्ञाशोध परीक्षांना परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. पालकच अशा परीक्षांना मुलांना बसवतात. ज्या पालकांना वाटते फसवणूक झाली त्यांनी गुन्हे दाखल करावेत किंवा मुख्यध्यापकांकडे तक्रार द्यावी. त्यांनी गुन्हा दाखल करावा. तरीही दखल घेतली जात नसेल, तर आमच्याकडे तक्रार करा. आम्ही गुन्हे दाखल करू. सर्व शाळांना पत्र काढून खासगी परीक्षेची सक्ती करू नये, असे कळवले होते. क्षितिजा प्रकाशनने सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परवानगी मागितलेली नाही.
'' अशोक कडूस, जिल्हा शिक्षणाधिकारी. 
बातम्या आणखी आहेत...