आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तेसाठी स्वतंत्र पर्यायाचा शोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या असल्या तरी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचे किंवा नाही, याबाबत पक्षात एकमत होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने आता काँग्रेसला सोडून अन्य पक्ष अपक्षांना बरोबर घेऊन सत्तेची गणिते जुळवण्यास सुरुवात केली आहे. 
 
या दोन्ही पक्षांकडून सत्तेसाठी स्वतंत्रपणे तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू असताना काँग्रेसला राष्ट्रवादीशिवाय किंवा राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचीच मदत लागणार, हे हेरून भाजपने “थांबा आणि पहा’ची भूमिका घेतली आहे. 
 
सत्तेपासून दूर असलेल्या जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मरगळ आली होती. जिल्हा परिषदेच्या निकालाने पुन्हा एकदा पक्षाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने २४, तर राष्ट्रवादीने १८ जागा मिळवल्या आहेत.त्याखालोखाल १४ जागा भाजपने घेतल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे असले, तरी हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र येण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता तिसऱ्या पर्यायाचा शोध सुरु केला आहे. सर्वाधिक जागा मिळविल्यानंतर तातडीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन समविचारी पक्षांना बरोबर घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले नसले, तरी समविचारी पक्ष कुठला हे मात्र विखे यांनी गुलदस्त्यात ठेवले. 
 
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे अर्थात विखे गटाकडे रहावे, यासाठी राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी शालिनी विखे यांचे नाव पुढे येत असले, तरी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचा या नावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू या दोन्ही नेत्यांनी आश्वी-जोर्वे ठेवला होता. या दोन्ही नेत्यांनी प्रचारात एकमेकांवरच टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद लपून राहिले नव्हते. सत्ता काँग्रेस स्थापणार हे नक्की असले काँग्रेसचा कुठला गट सत्ता स्थापणार याकडे आता लक्ष लागले आहे. सत्तेसाठी विखे हे थोरातांना बरोबर घेतात की थोरात विखे यांना बरोबर घेतात, हे पाहणे आता आैत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला बरोबर घेण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरही एकमत होत नसल्याने पक्षात संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला निमंत्रण मिळत नसल्याने राष्ट्रवादीने आता पर्यायाचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेते माजी आमदार दादा कळमकर नेवासे तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. नेवासे तालुक्यात गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या पाच जागा आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला स्वतंत्र सत्तेत येण्यासाठी गडाखांचीच मदत लागणार आहे. असे असले तरी दोन्ही काँग्रेसचे नेते हे आघाडी करण्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलले जाते. 
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी नगरमध्ये बैठक होणार असून, या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्तेबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. 
 
काँग्रेस वगळता आमच्याकडेही पर्याय 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरील चर्चेतील निर्णयानंतरच सत्तेची पुढची सूत्रे हलणार आहेत. मात्र, काँग्रेसने आम्हाला बरोबर घेतले नाही तरी आमच्याकडे पर्याय आहे.
’’ दादाकळमकर, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी. 
 
अन्य पक्षांबरोबर आमची चर्चा सुरू 
- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरमाझी चर्चा झाली. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अगोदर एकत्र यायचे किंवा नाही हे ठरवावे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन. अन्य पक्षांचे नेतेही माझ्याबरोबर चर्चा करत आहेत.
’’ शंकररावगडाख, माजी आमदार. 
 
सत्तेच्या दृष्टीने आमचे प्रयत्न 
जिल्हापरिषदेत आमचे १४ उमेदवार निवडून आले आहेत. शिवाय श्रीरामपूरमधील महाआघाडीतील दोन सदस्य असे १६ सदस्य संख्या आमची होती. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला एकमेकांशिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी आमचीच मदत लागणार आहे. आम्ही ही सत्तेच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत.
'' प्रा.भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप. 
बातम्या आणखी आहेत...