आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी बँकांची चौकशी मागे घेण्यासाठी विनवण्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भ्रष्टाचार झालेल्या सहकारी बँका, पतसंस्थांची चौकशी सुरू झाली आहे. या संस्थांचे बडे-बडे नेते आठवडा भरापासून माझ्या घरी येत असून चौकशी मागे घ्या, अशा विनवण्या करत आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. चौकशीत दोषी आढळणाऱ्या नेत्यांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही तसेच दोषी आढळलेल्या संस्था बंद केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.नंतर पत्रकारांनी पाटील यांना त्या नेत्यांची नावे विचारली असता त्यांनी ती सांगण्यास नकार दिला.

सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्या वेळी पाटील म्हणाले, ‘राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला सहकार क्षेत्र संपवायचे नाही. सहकार क्षेत्र वाढले म्हणूनच राज्यातील ग्रामीण भाग सुखी झाला असे आम्ही मानतो. आम्ही सहकार क्षेत्राच्या मागे उभे राहू. मात्र, स्वाहाकार, भ्रष्टाचार चालू देणार नाही. जे कोणी यात भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सहकार संपवायला निघाले ही आेरड कोणी करायची? ज्यांनी सहकार खाल्ला त्यांनी? त्यांनी आम्हाला सहकार शिकवण्याची आवश्यकता नाही’, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
‘मोठ-मोठे नेते माझ्या घरी येत आहेत. आमचे काही चुकले नाही. चौकशा मागे घ्या,अशा विनवण्या करत आहेत. पुढच्या आठवड्यात या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. या चौकशा कुणाच्या काळात सुरू झाल्या ? तुमच्या काळातच सुरू झाल्या ना? चौकशा सुरू करून तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक केली.

५ कोटींच्या मालमत्तेवर १०२ कोटींचे कर्ज
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ५ कोटींच्या मालमत्तेवर १०२ कोटींचे कर्ज मिळते. रिझर्व बॅक तेसुध्दा मॅनेज करते. या बँकेवर प्रशासक नेमण्यासाठी सहकार आयुक्तांना उच्च न्यायालयात जावे लागले. न्यायालयानेही रिझर्व बँकेला पंधरा दिवसांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सहकारात होत असलेल्या चुकीच्या गोष्टी आता विसरा. आम्ही २५ दिवस जरी राहिलो, तरी कडक काम करू, असे पाटील यांनी सांगितले.