आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमाता ब्रिगेड आंदोलन हे मोठे राजकीय षडयंत्र- अभय वर्तक यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर- शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी महिलांना परवानगी मिळावी, म्हणून भूमाता महिला रणरागिणी ब्रिगेडने केलेल्या आंदोलनामागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे त्यांची दखल घेता सरकारने रुढी परंपरेच्या विरोधात जाऊन निर्णय घेऊ नये, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केले.

सिटीझन जस्टीस प्रेस कौन्सिल आॅफ महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या ‘समाजप्रबोधन आणि आतंकवादाविरुद्ध राष्ट्रीय जनजागृती करणारी पत्रकारिता’ या विषयावरील व्याख्यानात वर्तक बोलत होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोजक नागेश सावंत, पत्रकार पद्माकर शिंपी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमन मुथा यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले, बालरोगतज्ज्ञ डॉ. कुमार चोथाणी, तृतीय पंथियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पिंक सुरैय्या यांचा कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वर्तक पुढे म्हणाले, भूमाता ब्रिगेडची भूमिका ही धार्मिक नसून केवळ राजकीय आहे. यापूर्वी आम्ही कोल्हापूर देवस्थान समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. पण काँग्रेस पक्षाचे पुढारी अडचणीत येतील म्हणून त्यांनी आंदोलनात भाग घेतला नाही. शनिशिंगणापूरचे आंदोलन हे प्रसिद्धी राजकारणासाठी ते करत आहेत. श्रद्धा आणि धार्मिक भाव त्यामागे नाही. यावेळी गुंदेचा यांचेही भाषण झाले. आदिनाथ जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नागेश सावंत यांनी आभार मानले.