आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव हत्याकांडासह चार जिल्ह्यांतील वाँटेड जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरवणे हत्याकांडातील पोलिसांनी जेरबंद केलेला दरोडेखोर परसिंग ऊर्फ परशा हरसिंग भोसले. - Divya Marathi
हरवणे हत्याकांडातील पोलिसांनी जेरबंद केलेला दरोडेखोर परसिंग ऊर्फ परशा हरसिंग भोसले.
नगर - शेवगावातील हरवणे कुटुंबीयांच्या हत्याकांड प्रकरणी फरार असलेला कुख्यात दरोडेखोर परसिंग ऊर्फ परशा हरसिंग भोसले (वय २९, रा. बाभुळखेडा, ता. नेवासे) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तब्बल सव्वामहिना तो फरार होता. कर्जत तालुक्यातील आखोणे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला जेरबंद केले. परशा भाेसले नगरसह चार जिल्ह्यांमध्ये वाँटेड होता. गेल्या महिन्यात बाभुळखेडा परिसरात पोलिसांवर गोळीबार करून तो फरार झाला होता. 
 
शेवगावच्या विद्यानगर कॉलनीत राहणाऱ्या हरवणे कुटुंबातील चौघांची १८ जूनला पहाटे गळा चिरून हत्या झाली होती. अप्पासाहेब गोविंद हरवणे (५८), सुनंदा अप्पासाहेब हरवणे (४८), स्नेहल अप्पासाहेब हरवणे (१८) आणि मकरंद अप्पासाहेब हरवणे (१५) अशी मृतांची नावे आहेत. या सामूहिक हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आठ दिवसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. बाभुळखेडा परिसरात आरोपींसोबत पोलिसांची धुमश्चक्री झाली होती. 
 
या गुन्ह्यातील फरार आरोपी परशा आखोणी शिवारात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, सहायक फौजदार मधुकर शिंदे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, काकडे, उमेश खेडकर, अंकुश ढवळे, पोलिस नाईक मल्लिकार्जुन बनकर, संदीप घोडके, संदीप पवार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, रावसाहेब हुसळे, मनोज गोसावी, सूरज वाबळे, नामदेव जाधव आदींनी परशाच्या मुसक्या आवळल्या. 
 
परशा भोसलेविरुद्ध शेवगाव हत्याकांडासह आणखीही गुन्हे आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये नांदगाव दरोडा, पिंपळगाव दरोडा, नेवासे येथे पोलिसांवर प्राणघातक हल्ला, आर्म अॅक्ट, राहुरी पोलिस ठाण्यात दरोडा, अशा गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच नगरसह नाशिक, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यांतही त्याच्याविरुद्ध गुन्हे आहेत. या चारही जिल्ह्यांच्या पोलिसांना तो हवा होता. 
बातम्या आणखी आहेत...