आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली ग्रामसेवकांची झाडाझडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वार्षिक कृती आराखड्यानुसार ग्रामपंचायती २८ फेब्रुवारीपर्यंत हगणदारीमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, पाणी स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी आढावा बैठकीत ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. जिल्ह्यात ६६ हजार शौचालये बांधण्याचे नियोजन होते. त्यापैकी ६१ हजार शौचालये बांधण्यात आली आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 
 
स्वच्छ महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबवली जात असून या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त शौचालये बांधण्यावर जिल्हा परिषदेचा भर आहे. जिल्हा परिषदेने शौचालय बांधकामाबाबत जनजागृती करण्यासाठी कुटुंबनिहाय संवाद मोहीम हाती घेतली होती. पथनाट्य, चित्ररथ या माध्यमातूनही जनजागृती केली गेली. सामान्य कुटुंबाने वैयक्तिक शौचालय बांधावे, यासाठी स्वच्छता विभाग, तसेच रोजगार हमी योजनेतून बारा हजारांचे अनुदान दिले जाते. गावपातळीवर स्वच्छता मोहीम राबवताना विद्यार्थ्यांसह सर्व शासकीय विभागांचीही मदत घेण्यात आली. 

संपूर्ण गाव हगणदारीमुक्त असल्याशिवाय त्या गावाला आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होता येत नाही. पाणी योजनांसह गावपातळीवर विविध योजनांसाठी शौचालयाची कामे बंधनकारक केली आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणी स्वच्छता विभागाने २०१६-२०१७ या वर्षातील कृती आराखड्यात ३६५ ग्रामपंचायती हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट घेतले होते. त्यानुसार जिल्ह्यात ६६ हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात येत आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. उद्दिष्टपूर्तीची मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस हातात असल्याने प्रशासनाकडून वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाचा आढावा घेतला जात आहे. राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता शेवगाव या आठ तालुक्यांतील वैयक्तिक शौचालय बांधणी कामाच्या बिनवडे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात सद्यस्थितीत सुमारे दोनशे ग्रामपंचायती हगणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायती नियोजित वेळेतच हगणदारीमुक्त होतील, असे ग्रामसेवकांनी बैठकीत सांगितले. ज्या ग्रामपंचायती नियोजित उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, त्या ग्रामपंचायतींवर कारवाई होण्याची शक्यता आहे, असे बिनवडे म्हणाले. 

तालुका निहाय शौचालयांची संख्या 
अकोले २०७७, जामखेड १९९५, कर्जत ३१३२, कोपरगाव ५४६०, नगर ३५७६, नेवासे ६९१८, पारनेर ६६२६, पाथर्डी ३३८५, राहाता ५९३८, राहुरी ४६६३, संगमनेर ४४१६, शेवगाव ४४६६, श्रीगोंदे ३५९२ श्रीरामपूर तालुक्यात हजार ९६ शौचालये बांधण्यात आली आहेत. 

वापरात असलेली शाैचालये किती? 
ग्रामपंचायती हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सध्या जोरदार मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे ६१ हजार शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली आहेत. परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागातील किती शौचालयांचा वापर होतो, याची माहिती सध्यातरी गुलदस्त्यात आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...