आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आगामी जिल्हा परिषदेसह सर्वच निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील, असे काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी शुक्रवारी जाहीर केले.
शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, गिरीश चौधरी, जयंत ससाणे, शोभा बच्छाव, अश्विनी बोरस्ते, प्रेमानंद रुपवते, हेमंत ओगले आदी उपस्थित होते.

तालुकानिहाय आढावा घेताना जगताप, विखे, थोरात यांनी सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी परिस्थिती पोषक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्यानंतर सन्मान दिला जात नाही, अशी खंतही व्यक्त करण्यात आली. त्यावर जगताप यांनी सन्मानजनक आघाडी झाली, तरच आपण सहमती दर्शवू, पण हा निर्णय प्रदेशपातळीवर घेतला जाईल. आघाडी होईल, या भ्रमात कोणीही राहू नका, स्वबळाची तयारी ठेवा. काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज पक्षाकडे घेऊन ठेवा. कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करून निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले, राज्यात २८८ मतदारसंघांत, मतदार संघनिहाय पक्षनिरीक्षक नेमले आहेत. आगामी निवडणुका थोरात विखे यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत. आम्ही मागील निवडणुकांची पार्श्वभूमी जाणून घेतली आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत सध्या काँग्रेससाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका स्वबळावर लढणार आहोत.

मराठामोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न
मराठा मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आक्रोश सुरू आहे. यात फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण त्यात ते अपयशी ठरले. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मराठा आक्रोश मुख्यमंत्री थांबवू शकणार नाहीत, असे विखे यांनी सांगितले.

संभाजी दहातोंडे काँग्रेसच्या वाटेवर
राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी दहातोंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. शुक्रवारी काँग्रेसच्या आढावा बैठकीला ते तळ ठोकून होते. परंतु, दहातोंडे यांनी जगताप आमचे जुने मित्र असल्याने त्यांची भेट घेण्यास आल्याचे स्पष्ट केले.

हातचा राखूनच घोषणा
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने स्वबळाची भाषा वापरली असली, तरी आघाडी होणार नाही, असे ठामपणे सांगितले नाही. सन्मानजनक आघाडी झाल्यास स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असा हातचा राखला.

आमचा उमेदवार आम्ही ठरवू
पदवीधर निवडणुकीत यापूर्वी आमचे उमेदवार जिंकले आहेत. आमचा उमेदवार आम्ही ठरवू. त्यासाठी कोणाचीही दादागिरी चालणार नाही, असा टोला जगताप यांनी राष्ट्रवादीला लगावला, तर विखे यांनी आघाडीत आमचा प्रासंगिक करार असतो, असे सांगितले.

मागील जिल्हा परिषद निवडणुकांची सल
२०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऐनवेळी आघाडीत बिघाडी होऊन निवडणुका स्वबळावर झाल्या. त्यातही सत्तास्थापन करताना काँग्रेसला बाजूला ठेवण्याची खेळी केली. याची सल असल्याने कार्यकर्त्यांनी पुन्हा स्वबळाची तयारी दर्शवली.
बातम्या आणखी आहेत...