आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत बिघाडी अन् भाजपमध्येही बंडखोरी, दिग्गजांनी भरले अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी उमेदवारी मिळाल्याने भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरी झाली. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीत जिरवाजिरवीच्या राजकारणाला उधाण येणार आहे. 
 
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंतांसह नवख्या उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली होती. पण अनेकांच्या पदरी निराशा पडल्याने उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अपक्ष, तसेच स्वतंत्र आघाडी करून अर्ज दाखल करणे पसंत केले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतील काही जागांचा तिढा सुटल्याने मैत्रीपूर्ण लढतीचेही संकेत देण्यात आले. पण दोन्ही काँग्रेसमधील बहुतेक जागांवर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. संगमनेर तालुक्यात शिवसेना, भाजप विखेप्रणित जनसेवा मंडळाने एकीची मोट बांधली. राहुरीतही काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र रिंगणात उतरले आहे. शेवगाव तालुक्यात भाजपच्या निष्ठावान हर्षदा काकडे यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याने त्यांची नाराजी वाढली. विधानसभेच्यावेळीही काकडे यांना पक्षाने थांबवले होते. आता विद्यमान सदस्य असतानाही उमेदवारी मिळत नसल्याने त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. त्यांनी स्वतंत्र जनशक्ती आघाडी स्थापन करून रिंगणात उडी घेतली आहे. 

नेवासे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गडाख यांच्या नेवासे आघाडीकडून उमेदवार देण्यात आले. त्यामुळे या तालुक्यातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. 

आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले असून भाजपमध्येही आता बंडखोरी होणार आहे. जामखेड तालुक्यात आरपीआयने भाजपची साथ सोडली आहे. तसेच काही ठिकाणी भाजप शिवसेना स्थानिक पातळीवर एकत्र आल्या असून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 
एकूणच या निवडणुकीत विखे, थोरात गटातील कुरघोडीचे राजकारण लक्षवेधी ठरणार आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्याची सल आहे. आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीपूर्वी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली, तर किती अर्ज माघारी येतात, त्यानुसार किती जागांवर तडजोड झाली हे स्पष्ट होईल. 

दिग्गजांनी भरले अर्ज 
निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनी विखे, विठ्ठल लंघे यांची कन्या, माजी आमदार पांडुरंग अभंग, सुनील गडाख, राजश्री गडाख, संभाजी दहातोंडे, शशिकला पाटील, कैलास वाकचौर, प्रभावती ढाकणे, शिवशंकर राजळे, संदेश कार्ले, मोहन पालवे, सुजित झावरे, आदी दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...