आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: बनावट दारुनिर्मितीला लागला सिव्हिलमधील अनागोंदीचा हातभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयातील कुलूप ठाेकलेले कँटीन. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयातील कुलूप ठाेकलेले कँटीन.
नगर - जिल्हारुग्णालयात दारूचा कारखानाच चालणे, या मागे तेथील अनागोंदीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींना पाच वर्षांपूर्वी कँटीन चालवण्यासाठी देण्यात आले होते. त्याची मुदत घटनेच्या आधी तीन दिवस संपली होती, तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रुग्णालयात प्रशासन कर्मचाऱ्यांत माजलेली बेदिली बेशिस्त, रुग्णसेवेचा घसरलेला दर्जा, काही अधिकारी कारकुनी करणाऱ्यांची अरेरावी यांचा गैरफायदा यातील प्रमुख आरोपी जितू गंभीर पत्रकार म्हणवणारा जाकीर शेख यांनी घेतला. त्यांनी महत्त्वाच्या लोकांना धाकात ठेवून आपली काळीकृत्ये थोडीथोडकी नव्हे, तर पाच वर्षे सुरू ठेवल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे.
एकेकाळी या रुग्णालयाला सलग तीन वर्षे राज्यातील उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दलचा पहिला पुरस्कार मिळाला आहे. आता मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणा गैरव्यवहारांमुळे ही सेवा पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यांत सामान्य गरीब रुग्ण भरडला जात आहे. रुग्णालयात आलेले रुग्ण इतरत्र पळवण्याची संघटित यंत्रणा रुग्णालयात कार्यरत आहे. विशेषत: अपघात झालेले रुग्ण शहरातील काही खासगी रुग्णालयात परस्पर पाठवले जात आहेत. त्याबद्दलचे कमिशन खाऊन येथील काही कर्मचारी प्रचंड श्रीमंत झाले आहेत. रुग्णालयात शिस्त नावालाही उरलेली नाही. प्रशासकीय अधिकारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा गणवेश सक्तीचा आहे, पण शिस्तीचे वावडे असल्याने कडक खादीचे कपडे घालून लोक कामावर येत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्यानेच ‘दिव्य मराठी’ला दिली. रुग्णालयातील विविध बाबींत पैसे खाऊन काही लोक इतके गब्बर झाले आहेत, की एका कर्मचाऱ्याने त्याच्या मुलीच्या लग्नात २५ लाखांचा खर्च केल्याची खमंग चर्चा जिल्हा रुग्णालयाचा वर्तुळात नेहमी सुरू असते. अशी येथील संपूर्ण यंत्रणा किडलेली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बेकायदा सायकलस्टँडला परवानगी देण्यात आली. त्यानंतर वाहनतळाचा      ठेका देण्यात आला. या दोन्ही प्रकारांत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे बोलले जाते. कँटीनसह हे दोन ठेके आपल्या काळात देण्यात आलेले नसल्याचे सध्याच्या जिल्हा शल्य चिकित्सकांचे म्हणणे आहे. पण, असे म्हणल्याने त्यांची जबाबदारी संपत नाही. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बनावट दारूचा कारखाना सुरू राहतो, त्याची माहिती त्यांना मिळत नाही, यावरून त्यांचे किती लक्ष आहे, हेही स्पष्ट होते. 

प्रशासनाने याबाबत काही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, तर संघटनेच्या बळावर प्रशासनाला धाकात ठेवण्यात येत आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांची संघटना यांतील बेदिलीचा गैरफायदा घेऊन बनावट दारू तयार करणाऱ्यांनी घेतल्याचे समजते. मुळात रुग्णालयाच्या मुख्य इमारतीपासून जेमतेम शंभर फूट आहे. तेथे चहा पिण्यासाठी पोलिस येत असत. कारण वाहतूक पोलिस ठाणे जिल्हा रुग्णालयाचे कुंपण एकच आहे. तेही मध्ये तोडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना त्या कँटीनमध्ये येणे सोपे झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिस तेथे येत असताना त्यांना या बनावट दारूची साधी भनकही का लागली नाही, याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यातील संपूर्ण कायदा सुव्यवस्थाच संकटात सापडली आहे. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. उत्पादन शुल्क विभाग आठ बळी गेल्यानंतर जागा झाला आहे. आता हा विभाग ज्या कारवाया करत आहे, त्या आधी का केल्या नाहीत? आताच यांचे खबरे कसे काय माहिती द्यायला लागले, याचे समाधानकारक उत्तर या विभागाला द्यावे लागणार आहे. जितू गंभीरवर या आधी बनावट दारू तयार करण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई पुढे का सरकली नाही? तिचे काय झाले? याबाबत पोलिस काहीही बोलत नाहीत. त्यानंतर त्याने राजकीय लागेबांधे बळकट केले आपला हा काळा धंदा पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या कँटीनमध्ये राजरोसपणे सुरू ठेवला. 

कँटीनची गरजच काय? 
मुळात हे कँटीन एका बाजूला बांधण्यात आले. तेथे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी किंवा रुग्णांचे नातेवाईक जात नव्हते, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच दिली. या कँटीनचा वापर फक्त एकांत हवा असलेले महाविद्यालयीन युवक-युवतीच तेथे जात होते. त्यांच्यासह फक्त पोलिसांचाच येथे राबता होता. आता हे कँटीन पुन्हा सुरू होऊ देण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या संघटनेने दिला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...