आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी अंकांना आले पुन्हा चांगले दिवस, तरुणाई वळतेय पुन्हा वाचनाकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिवाळी अंकांच्या रूपाने साहित्य चळवळीने पुन्हा जोम धरला आहे. यावर्षी दिवाळी अंकाच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. यंदाचे दिवाळी अंक प्रामुख्याने आर्ट पेपरवर छापलेले असल्याने अतिशय देखणे झाले आहेत. या अंकांना मोठी मागणी असल्याची माहिती ‘साहित्य नगरी’चे नवनाथ भाबड यांनी ‘दिव्य मराठी’ शी दिली.
बालगोपाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी आनंदाची उधळण करणारा दिवाळी हे उत्साहाचे पर्व असते. दिवाळीचा फराळ, खरेदीसोबतच दिवाळी अंकाची मेजवानी वाचकांसाठी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या अंकाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वाचक रसिकांचे पाय सध्या पुस्तकांच्या दुकानांकडे वळत आहेत. दिवाळीच्या सुटीत असलेली उसंत हेही यामागे एक कारण आहे. महावीर कलादालनात सुरू असलेल्या साहित्यनगरीच्या पुस्तक प्रदर्शनात दिवाळी अंकांची तडाखेबंद विक्री होत आहे. भाबड यांनी दिवाळी अंकांचे प्रदर्शनच येथे लावले आहे. दिवाळी अंकांशिवाय इतर पुस्तकांच्या खरेदीसाठी तरुणांची मोठी गर्दी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल साईटच्या प्रभावामुळे तरुणाई वाचनापासून दुरावत चालल्याची ओरड होत असताना तरुणाई ग्रंथांकडे वळत असल्याचे चित्र उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य नगरीचे महावीर कलादालनातील पुस्तक प्रदर्शन जवळजवळ वर्षभर सुरू असते. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भाबड यांचे म्हणणे आहे. म्हणूनच ते नगरमधील प्रदर्शन कायम ठेवतात. दिवाळी अंकांच्या बाबतीतही तेच घडत आहे. विविध विषयांतील दिवाळी अंकांना मागणी वाढली आहे. काही अंक तर प्रदर्शनात ठेवल्यानंतर लगेच संपले आहेत. त्यांच्याकडे सुमारे चारशेहून अधिक दिवाळी अंक उपलब्ध आहेत. अजून बरेच दिवाळी अंक यायचे आहेत. उत्कृष्ट मुखपृष्ठ, गुळगुळीत पानावरील रंगीत चित्रे आणि वाचनीय लेख ही दिवाळी अंकांची खासियत ठरत आहे. किस्त्रीम, शतायुषी, मेनका, मौज, मार्मिक, जत्रा, दक्षता, आवाज, किशोर या दिवाळी अंकांची लोकप्रियता अजूनही पूर्वी इतकीच टिकून असल्याचे भाबड सांगतात. त्यात यावर्षी अनेक अंकांची भर पडली आहे.

आता सामाजिक विषयांवर, तसेच दुर्ग भटकंती, विविध प्रकारचे दगड या विषयांवरही ‘भवताल’सारखे खास दिवाळी अंक निघाले आहेत. पाककलेचे धडे देणारे अन्नपूर्णा, रुचकर, चटपटीत, मेजवानी, रुचकर असे अनेक दिवाळी अंक महिलांमध्ये विशेष प्रिय आहेत. भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी मुशाफिरी, पर्यटन, भटकंती, तसेच ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी दुर्गाच्या देशातून यासारखी दिवाळी अंक यंदा प्रसिद्ध झाले आहेत.
बच्चे कंपनीसाठी गंमत-जंमत, किशोर, छोट्यांचा आवाज यासारखे अनेक लोकप्रिय अंक प्रकाशित झाले आहेत. सिनेमा, सिनेतारकांबद्दल सांगणारे प्रीमिअर, तारांगण, सिनेनाट्य असे अंक उपलब्ध आहेत. महिलांसाठी खास श्री सौ., तनिष्का, चारचौघी, माहेर हे दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मार्गदर्शन करणारे युनिक बुलेटिन, व्हिजन स्पर्धा परीक्षा हे अंकही दिवाळी अंकाच्या विषयांमध्ये विविधता येत असल्याचे निदर्शक आहेत. मनोरंजनाबरोबरच त्यांची उपयुक्तताही त्यामुळे वाढली आहे. आरोग्याचे मंत्र सांगणारे शतायुषी, आयुर्वेद वैभव, नगरहून प्रसिद्ध होणारे मणिपुष्पक, तर मधुमेहावर डायबिटीस मित्र असे दिवाळी अंक पूर्णपणे आरोग्यविषयांना वाहिलेले आहेत. त्यांनाही मागणी आहे. चांगल्या प्रतीचा कागद वापरण्यात आल्याने या अंकांचा टिकाऊपणाही वाढला आहे. एकशे पंचवीस ते दोनशे रुपये अशी अंकांची किंमत आहे.

साहित्य नगरीच्या महावीर कलादालनात सुरू असलेल्या ग्रंथ प्रदर्शनात लावण्यात आलेल्या दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाला सध्या मोठा प्रतिसाद लाभत आहे. छायाचित्र : मंदार साबळे.

दिवाळी अंकांचे स्वरूप आकर्षक झाले
^मध्यंतरी राज्यभरातील दिवाळी अंकांची मागणी घटली होती. त्यामुळे अंकही प्रसिद्ध होण्याचे प्रमाण कमी झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून मात्र दर्जेदार दिवाळी अंकांना पुन्हा मागणी वाढली आहे. याचे कारण त्यांचा लेखन कागदाचा दर्जा उंचावला आहे.’’ नवनाथ भाबड, संचालक, साहित्यनगरी.
बातम्या आणखी आहेत...