आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले हक्क मिळवण्यासाठी आजही महिलांचा संघर्ष सुरू- कॉम्रेड स्मिता पानसरे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महिलांनी संघर्ष करून आपले हक्क मिळवले. मात्र, आजही महिलांना आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. स्त्री भ्रूणहत्येचे पाप समाजात घडत आहे. कुटुंबामध्ये महिलांना आदराची वागणूक दिल्यास यात बदल होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य महिला फेडरेशनच्या सचिव कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी व्यक्त केली. 

महिला दिनानिमित्त श्रमिकनगर येथे आयोजित कामगार मेळाव्यात पानसरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बुचम्मा श्रीमल होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून बेबी लांडे, नगरसेविका विणा बोज्जा, शंकर न्यालपेल्ली, सुभाष लांडे, सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते उपस्थित होते. 
 
सगुणा श्रीमल म्हणाल्या, वीस वर्षांपूर्वी विडी कामगारांच्या मुलींना लग्न जुळवताना विडी वळता येते का, असे विचारले जायचे. आज मुलगी किती शिकली, हा प्रश्न विचारला जातो. हा बदल विडी कामगार महिलांनी घडवला. पाहुण्यांचे स्वागत भारती न्यालपेल्ली यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ विडी कामगार तथा लीलाबाई कैरमकोंडा यांचा गौरव करण्यात आला. 
 
महिलांनी समान हक्कासाठी लढा दिल्याने आज वडिलांबरोबर आईचे नाव लावले जाते, असे बेबीताई लांडे यांनी सांगितले. रोहिणी म्याना, भाग्यलक्ष्मी गड्डम, भारती न्यालपेल्ली, संगीता कोंडा, सविता देवसान, सुनीता बिटला यांनी आठ कलमी ठराव मांडला. सर्व शिक्षित महिलांना शासकीय, निमशासकीय खासगी कंपनीत नोकरीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे, सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना सेमी इंग्रजीचे शिक्षण द्यावे, सुशिक्षित बेरोजगार युवतींना दरमहा अडीचशे भत्ता मिळावा, तेलंगणमधील विडी कामगारांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जीवन भत्ता म्हणून हजार रुपये सुरू करावेत, विडी कामगारांना पूर्वीप्रमाणे साप्ताहिक मजुरी द्यावी, सावेडीतील शेतसारा रद्द करावा, अशी मागण्या करण्यात आल्या.
 
महापालिकेने पाणीपट्टीत वाढ करू नये, ६० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना दरमहा अडीच हजार रुपये द्यावेत, असेही ठरावामध्ये म्हटले आहे. सूत्रसंचालन अश्विनी नल्ला यांनी केले. आभार शोभा बडगू यांनी मानले. मेळाव्यास विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...