आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी वसूल करणाऱ्या टोळीचा ‘स्वामी’ कोण?, हे आहेत आरोपी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-सोलापूर रस्त्यावरील टोलनाक्यांवर ट्रकचालकांकडून सक्तीची खंडणी वसुली करणाऱ्यांना पकडण्यात आले. - Divya Marathi
नगर-सोलापूर रस्त्यावरील टोलनाक्यांवर ट्रकचालकांकडून सक्तीची खंडणी वसुली करणाऱ्यांना पकडण्यात आले.
नगर - पथक करवसुलीच्या नावाखाली नगर-सोलापूर रस्त्यावर असलेल्या टोलनाक्यांवर परजिल्ह्यांतील ट्रकचालकांकडून सक्तीची खंडणी वसुली अजूनही सुरूच आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात ही बाब समोर आली. गुन्हे शाखेने ११ जणांना ताब्यात घेतले. ही लूटमार वर्षानुवर्षे सुरू असल्याचे ट्रकचालकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या नाक्यावर यापूर्वीही पोलिसांच्या कारवाईत ही बाब समोर आली होती. या लूटमार करणाऱ्या टोळीचा मुख्य ‘स्वामी’ कोण, याचा शोध पोलिस घेत आहेत. 
 
नगर-सोलापूर रस्त्यावर भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पथकर वसुली नाका आहे. या नाक्यावर ट्रकचालकांना ६० रुपयांचा कर द्यावा लागतो. मात्र, वसुलीसाठी नेमलेल्या युवकांच्या टोळ्या पावत्या देता ट्रकचालकांकडून जास्त रकमेची वसुली करतात. कधी कमी रकमेची पावती देऊन अधिक रक्कम वसूल केली जाते. याबाबत काही ट्रकचालकांनी थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला छापा टाकून कारवाई करण्याची सूचना केली. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. 
 
फौजदार सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, सोन्याबापू नानेकर, दत्ता गव्हाणे, विजय वेठेकर, दत्तात्रेय जपे, मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, शंकर चौधरी, गवांदे, सचिन अडबल यांच्या पथकाने सोलापूर रस्त्यावर जाऊन खात्री केली. मध्यरात्रीच्या सुमारास नगरहून सोलापूरला जाणाऱ्या वाहनचालकांकडून करवसुली करणाऱ्या, तसेच सोलापूरहून नगरकडे येणाऱ्या वाहनांकडून करवसुली करणाऱ्या नाक्यावर पोलिस जाऊन थांबले. काही ट्रकचालकांकडे त्यांनी चौकशी करुन पावत्यांची विचारणा केली. वसुली करणारे गुंड बळजबरीने अधिक रकमेची वसुली करत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.पोलिसांनी दोन्ही नाक्यांवर असलेल्या एकूण ११ जणांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी आधी व्यवस्थित माहिती दिली नाही. झडती घेतली असता प्रत्येकाकडे पथकर वसुलीच्या पावत्या विविध दराच्या चलनी नोटा मिळाल्या. एकूण ५२ हजार ४०० रुपयांची रोकड मिळाली. पोलिसांनी विचारणा केली असता कोणीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे हेड कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद यांनी या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संगनमताने एकत्र येऊन खंडणी वसूल करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
भीतीने बदलले रस्ते 
सोलापूर नाक्यावर काही गुंड सक्तीने खंडणी वसूल करतात. अधिक रक्कम देणाऱ्या चालकांना बेदम मारहाण केली जाते. नेहमीचा मार्ग असल्याने पोलिसांकडे तक्रार केल्यास त्रास होईल, अशी भीती चालकांना असते. त्यामुळे बऱ्याचदा ट्रकचालक तक्रार करायचे टाळतात. काही ट्रकचालकांनी मारहाण खंडणी वसुलीच्या भीतीने रस्तेच बदलले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब समोर आली. खंडणी वसुलीमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीही नित्याची बाब झाली आहे. 
 
वारंवार तोच प्रकार 
सोलापूर रस्त्यावरील पथकर नाक्यावर सक्तीने अधिक रक्कम वसूल केली जाते. ट्रकचालकांनी यापूर्वी तक्रारी केल्यामुळे तत्कालीन एपीआय विनोद चव्हाण यांनी कारवाई करुन काही गुंडांवर खंडणीचा गुन्हा नोंदवला. नाक्यावर सूचनाफलक लावून खंडणी वसुली होत असल्यास तत्काळ पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. मध्यंतरी एपीआय कैलास देशमाने यांनीही कारवाई करुन युवकांना पकडले होते, तरीही खंडणीवसुली सुरूच असल्याचे या कारवाईमुळे सिद्ध झाले. 
 
हे आहेत आरोपी 
विजयशिवाजी चव्हाण (पारोळा, जळगाव), अजय दिलीप कोळी (शिरपूर, धुळे), संदीप रघुनाथ भोसले (दरेवाडी, नगर), अजय आचा स्वामी (इराणी रस्ता, भिंगार), मंगेश युवराज ओव्हळ (करमाळा, सोलापूर), पंकज राजू गवळी (गवळीवाडा, भिंगार), वाहिद लाला शेख (सैनिकनगर, भिंगार), अनिल अंबादास अळकुटे (वडारवाडी, भिंगार), सागर राजू परदेशी (घासगल्ली, भिंगार), राजेंद्र जयसिंग गोरे (रुईछत्तीशी, नगर), शुभम प्रताप लाहोट (माधवबाग, भिंगार). 
 
दसपट खंडणी वसुली 
सोलापूर रस्त्यावरील कॅन्टोन्मेंट नाक्यावर ६० रुपये पथकर वसूल केला जातो. छाप्याच्या वेळी चौकशी केली असता ६० रुपयांची पावती देऊन ट्रकचालकांकडून सक्तीने ४०० रुपयांची वसुली होत असल्याची बाब समोर आली. काही वाहनचालकांना पावतीही दिली जात नाही. दिवसभरात या नाक्यावर हजारो वाहने ये-जा करतात. यावरुन किती मोठी आर्थिक उलाढाल होते, याचा अंदाज येतो. ही बाब नित्यनेमाने सुरू असूनही आजवर जुजबीच कारवाई झालेल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...