आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटचे तीन दिवसच राहणार बारापर्यंत नगरमध्ये देखावे खुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेश उत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत देखावे सादर करण्यास, ध्वनिक्षेपणास परवानगी द्यावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेवटचे तीन दिवसच ध्वनिक्षेपणाच्या वेळेत वाढ करण्यास परवानगी आहे. त्यामुळे शेवटचे तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपणास परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. पोलिस मुख्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 
 
पोलिसांच्या वतीने आयोजित या बैठकीला यंदा प्रथमच पालकमंत्रीही उपस्थित होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्याधिकारी माने, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस, महापालिका वीज मंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते. 
मंत्री शिंदे म्हणाले, गणेश उत्सव इतर सर्व सण शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सवात देखावे मिरवणूक पहायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी महापालिकेने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. ड्रेनेज दुरुस्ती करावी, कचरा उचलण्याचे नियोजन करावे. तसेच महावितरणने या काळात वीज पुरवठा खंडित होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. 

काही तांत्रिक कारणास्तव वीज पुरवठा खंडित करणे आवश्यक असेल, तर तशी कल्पना नागरिकांना द्यावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. तत्पूर्वी शांतता समितीचे सदस्य उबेद शेख, गणेश अष्टेकर, नलिनी गायकवाड, संजय सपकाळ, जरिना पठाण, कैलास गिरवले, पंडित खरपुडे, आशा निंबाळकर आदींनी गणेश उत्सव शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूचना केल्या. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन उबेद शेख यांनी केले.भिंगारच्या गणेश मंडळांनाही विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री बारापर्यंत परवानगी द्यावी, भिंगारमधून गेलेल्या महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी केली. आशा निंबाळकर यांनी शहरातील रस्ते खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली. जरीना पठाण यांनी अवजड वाहतुकीला आळा घालावा, अशी सूचना मांडली. कैलास गिरवले यांनी अखेरचे पाच दिवस ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला. पंडित खरपुडे यांनी गर्दीची संधी साधून पाकीट मारण्याचे प्रकार घडतात असे सांगितले. पाकिटमारांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती त्यांनी केली. अन्वर शेख, नलिनी गायकवाड, शाहबाज शेख यांनीही सूचना मांडल्या. बकरी ईद सणाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची विनंती करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहकार्य करण्याचे अाश्वासन सर्वांनी दिले. या बैठकीचे सूत्रसंचालन अॅड. शिवाजी अण्णा कराळे यांनी केले. 
 
मंडळांना बक्षिसे 
शहर जिल्ह्यातील शिस्तबद्ध उत्कृष्ट गणेश मंडळांना आकर्षक ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पोलिस, शांतता समिती सदस्य, पत्रकार, महसूलचे अधिकारी, मंडळांचे परीक्षण करतील. खड्डे दुरुस्ती, मोकाट जनावरांचा बंदोबस्त यासाठी महिन्यांपासून मनपाकडे पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेऊ, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 

ताेपर्यंत खड्डे बुजवू 
गणेश विसर्जनाच्या दिवशीपर्यंत शहरातील गणेश मंडळांच्या परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी दिले. कचरा उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. गणेशोत्सवात दोन शिफ्टमध्ये हे काम केले जाईल. नागरिकांनी चौकात कचरा गोळा केल्यास हे काम सोपे होईल. ड्रेनेजदुरुस्तीही केली जाईल, अशी माहिती मंगळे यांनी दिली. 

समितीची पुनर्रचना हवी 
शांतता समितीच्या बैठकीत गेल्या काही वर्षांपासून तेच तेच चेहरे दिसत आहेत. त्यांचा अनुभव चांगलाच आहे. मात्र, आता नव्या उमेदीच्या सदस्यांनाही या समितीत काम करण्याची संधी मिळायला हवी, असे मत पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले. त्यादृष्टीने या समितीची पुनर्रचना व्हायला हवीे. विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांकडून सर्रास डीजे वाजवले जातात. अशा मंडळांचे पदाधिकारी शांतता समितीच्या बैठकीला फिरकलेच नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...