आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागाने घर सोडलेली मुलगी सुखरूप पालकांच्या ताब्यात, संपर्क साधण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नगर - आई रागावल्यामुळे घरातून निघून आलेल्या मुलीने स्वत:ला कुंटणखाण्यात विकल्याचा बनाव केला अन् प्रशासन कामाला लागले. स्नेहाधारमध्ये या मुलीला दाखल केल्यानंतर सत्य समोर आले. स्नेहाधारच्या प्रकल्प व्यवस्थापिका शिल्पा केदारी टीमच्या प्रयत्नांमुळे मुलीच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला अन् तिला सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
 
राहुरीच्या उषा तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे ही मुलगी स्नेहाधारमध्ये आली होती. घरात लाडात वाढलेली शिखा (नाव बदललेलं) व्यावसायिक प्रशिक्षणास गैरहजर असल्याचे कळल्याने आई तिला रागावली. रागीट स्वभावाच्या शिखाने आई ओरडल्यामुळे घर सोडले. कोल्हापूरला जाताना तिला नीता आणि गीता नावाच्या दोन सख्या बहिणी भेटल्या. त्यांना घाबरलेल्या अवस्थेत पाहून तिने चौकशी केली. त्यांनीही सावत्र आईला कंटाळून घर सोडल्याचे सांगितले.
त्यांच्याजवळ पैसे नसल्याने शिखाने त्यांना मदत करायचे ठरवले. तेथून त्या शिर्डीत दाखल झाल्या. 
 
प्रसादालयात जेवल्यानंतर कुठे काम मिळेल का, याची चौकशी त्यांनी केली. एका बाईने त्यांना राहुरीत लिज्जत पापड कारखाना असून तिथे तुम्हाला काम मिळेल, असे सांगितले. त्यामुळे या तिघी राहुरीत दाखल झाल्या. राहुरी कारखान्यावर आल्या असताना डॉ. उषा तनपुरे यांच्या वाहनचालकाला या तिघी दिसल्या. डॉ. तनपुरे यांचाशी यांनी तिघींना घरी बोलावून घेतले. चौकशी केली असता मुलींनी त्यांना बनावट कथा सांगितली. 

पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपेल्लू यांनी शिखाला स्नेहाधार प्रकल्पात दाखल केले. माहिती सांगताना ती खूप विचारपूर्वक बोलत होती. त्यामुळे स्नेहाधारच्या टीमला थोडा संशय आल्याने त्यांनी शिखाची अधिक माहिती काढण्याचा प्रयत्न केला. शिखाचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे ओळखपत्र त्यांच्या हाती लागले. त्यावर असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता तिच्या आईशी बोलून शिल्पा केदारी(प्रकल्प व्यवस्थापिका) यांनी सर्व माहिती घेतली. 

स्नेहालयाचे विश्वस्त रावसाहेब दुशिंग यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा केली. शिखाचे आई, वडील जिवंत असून तिच्यावर कुठलाही अतिप्रसंग झाला नसल्याचे समोर आले. तिच्या आई-वडील आजीला शिखा स्नेहाधार प्रकल्पात सुखरूप असल्याचे पाहून आनंदाश्रू अनावर झाले. पालकांना पाहून शिखानेही हंबरडा फोडला. मग शिखाला तिच्या इच्छेनुसार पालकांच्या ताब्यात स्नेहाधारने सोपवले. तिला सुखरूप पोहोचवण्यासाठी प्रियंका सोनवणे, योगिता जगताप यांनी परिश्रम घेतले. 

संपर्क साधण्याचे आवाहन 
संकट ग्रस्त महिला युवती संकटात असतील, तर स्नेहाधार प्रकल्पाशी केव्हाही संपर्क साधू शकतात. महिला युवतींनी काहीही अडचण आल्यास स्नेहाधार प्रकल्पाच्या ०२४१२३४०४४४/५, ९०११३६३६००, ९०११०२०१७५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहाधारच्या प्रकल्प समन्वयक शिल्पा केदारी यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...