आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदाच्या चिऱ्यासमोर ना पणती, ना वंदना, शहीद भाऊसाहेब तळेकर यांचा आज १६ वा स्मृतिदिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहिदोंके चिताओं पर, लगेंगे हर बरस मेले
वतनपर मिटनेवोलों का बाकी यहीं निशां होगा...
हिंदीतीलही सुप्रसिद्ध कविता. दरवर्षी मेळे, तर सोडाच पण शहीद झाल्याच्या १५ दिवसांनंतर सर्वच जण शहीद त्याच्या परिवारास विसरून जाण्याचा अनुभव सध्या श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील शहीद भाऊसाहेब मारुती तळेकर यांचे कुटुंबीय घेत आहेत. स्मारकाचा चिरा आहे, पण पणती लावायला कोणालाही सवड आणि आठवणही नाही, अशी येथे स्थिती आहे.

जम्मू विभागातील नौशेरा येथे कार्यरत असताना २७ फेब्रुवारी २००० रोजी भाऊसाहेब शहीद झाला. देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची हीच किंमत आहे का? एकुलता एक मुलगा गमावलेल्या ७५ वर्षांच्या पित्याचा हा प्रश्न काळीज हेलावून टाकतो. मध्यंतरी, म्हणजे जानेवारी २०१३ मध्ये शहीद लान्स नाईक हेमराज याचे शीर कापून नेण्याची घटना जम्मू परिसरात मेंढर येथे घडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांचेही लक्ष त्याच पद्धतीने शहीद झालेल्या भाऊसाहेब तळेकर यांच्या कुटुंबाकडे गेले. दोन दिवस बातम्या आल्या. त्यानंतर पुन्हा सर्व शांत झाले.

श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव हे गाव अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. लष्करात भरती झालेले तालुक्यातील सर्वाधित तरुण या गावातील आहेत. कोळगावपासून एक किलोमीटरवर एका वस्तीवर तळेकर कुटुंबीय राहतात. शहीद भाऊसाहेबचे वडील मारुती तळेकर सालगड्याचे काम करायचे. एका झोपड्यात सर्व रहायचे. पावसाळ्यात ओल्या जमिनीवर अंथरूण टाकून झोपावे लागायचे. पण भाऊसाहेब जिद्दी होता. त्याला कुटुंबाला या दारिद्र्यातून बाहेर काढायचे होते.
त्यासाठी तो लष्करात भरती झाला. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. एकुलता एक मुलगा शहीद झाल्यानंतर त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांनी सर्व काम सोडले. त्या घटनेला सोळा वर्षे झाली, तरी अजूनही ते शुन्यात नजर लावून बसलेले असतात. चेहऱ्यावरची खिन्नता त्यांना भेटायला येणाऱ्यांच्या काळजाला घरे पाडणारी असते. मारुती सीताबाई दांपत्याला दोन मुली आहेत. मोठ्या चतुराचे लग्न आधीच झाले होते. भाऊसाहेब मधला. मीनाक्षी तिसरी. तिचे लग्न भाऊसाहेबच्या मृत्यूनंतर झाले. या दोघीच सध्या माता-पित्याची काळजी घेत आहेत. जे काही बोलणे झाले, ते त्यांच्या पत्नी सीताबाईच बोलतात.

एकच मुलगा असल्याने त्यास लष्करात जाण्यास आई-वडिलांचा विरोध होता. पण, मृत्यू तर कोठेही येतो. देशासाठी शहीद झालो, तर मागे लोक नाव घेतील, असे भाऊसाहेबचे म्हणणे होते. त्याचसाठी तो लष्करात गेला. देशसेवेसाठी त्याने प्राणही दिले. पण, त्याच्या बलिदानाची लष्कराने आणि ज्यांच्यासाठी बलिदान दिले, त्या जनतेनेही उपेक्षाच केली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आम्ही दररोज मरतोय
भाऊसाहेबएकदा शहीद झाला. पण, उपेक्षेने आणि त्याच्या आठवणींनी आम्ही दररोज मरत आहोत. त्याची आठवण आली नाही, असा एकही दिवस गेला नसल्याचे सांगताना त्यांचे डोळे पुन्हा ओलावतात.

मुलाचे अंत्यदर्शनही नाही
जम्मूविभागातील नौशेरा येथे कार्यरत असताना भाऊसाहेब शहीद झाला. त्याचे शीर पाकिस्तानी जवान नंतर अतिरेकी बनलेला इलयास काश्मिरी याने कापून नेले. ते त्याने बायोनेटला लावून नाचवल्याचेही सांगितले जाते. काळजाचा तुकडा असलेल्या भाऊसाहेबाचे फक्त धड लाकडी पेटीत घालून आणण्यात आले. शीर नसलेल्या धडाचे अंतिम दर्शनही कुटुंबीयांना घेऊ देण्यात आले नाही. त्यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी प्रचंड गोपनीयता पाळली. नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश करत मृतदेहाच्या दर्शनाची मागणी केली, पण शवपेटी उघडण्यात आली नाही.
शवपेटीसोबत आलेल्या जवानाने तसे केल्यास आपली नोकरी जाईल, असे सांगितले. आपला मुलगा, तर गेला पण दुसऱ्याची नोकरी जाऊ नये म्हणून सर्व गप्प बसले. शेवटी त्या लाकडी शवपेटीसह अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात दुसरा जवान शहीद झाला तेव्हा त्याचे अंत्यदर्शन सर्वांना घेता आले होते. आमच्या एकुलत्या एक मुलाला आम्हाला शेवटचे पाहताही आले नाही, अशी सल सीताबाई तळेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

भाऊसाहेब तळेकर
मुलाला मिळालेल्या स्मृतिचिन्हांसह श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील २७ फेब्रुवारी २००० रोजी शहीद झालेल्या भाऊसाहेबचे वडील मारुती आई सीताबाई तळेकर.

आश्वासने विरली हवेतच...
भाऊसाहेबाच्यामृत्यूनंतर लष्कराने त्याच्या माता-पित्यास विमा इतर सर्व रक्कम प्रदान केली. पण बहीण मीनाक्षीला नोकरी देण्याचे आश्वासन पाळले गेले नाही. त्यासाठी तिला एम. ए. बी. एड. शिकण्याचा आग्रह लष्करी अधिकाऱ्यांनी धरला होता. त्यानुसार लष्कराच्या वसतिगृहात राहून तिचे शिक्षण झाले. त्यानंतर मात्र वयामुळे तिचे लग्न करावे लागले. या लग्नाचे कारण देऊन नोकरी नाकारण्यात आलीे. त्यांना पेट्रोलपंप देण्याचेही कबूल करण्यात आले. मात्र, तेही पाळले गेले नाही.

शहीद दिनीही आठवण नाही...
शहीदहोण्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सर्व वजनदार नेत्यांची दररोज वर्दळ होती. आश्वासनांचा जोरदार पाऊस पडला, पण एकही आश्वासन पाळण्यात आले नाही. एकुलत्या एक मुलाने देशासाठी प्राणाचे सर्वोच्च असे बलिदान दिले, पण त्याच्या वृद्ध आई-वडिलांकडे ढुंंकून पाहण्यास कोणालाही वेळ नाही. गावाचा गौरव वाढवणाऱ्या शहीद भाऊसाहेबाबरोबरच शहीद सचिन साकेच्या घरही अशीच परिस्थिती आहे.

शहीद स्मारकात आता विवाहांचे मेळे
शहीदभाऊसाहेबच्यास्मारकासाठी खासदार दिलीप गांधी शहीद भवन बांधण्यासाठी पाच लाख रुपये दिले. या शिवाय मोठ्या प्रमाणावर वर्गणीही गोळा करण्यात आली. मात्र, साधे पत्र्यांचे शहीद भवन उभारण्यात आले. त्यातही भ्रष्टाचार करण्यात आला. आता त्यात लग्ने होतात. याचे उत्पन्न ग्रामपंचायतीकडे जाते. आम्हाला पैसा नको, पण किमान त्याच्या शहीददिनीही येथे येऊन शहिदांना वंदन करण्याचेही कोणाला भान नाही. शहीद भाऊसाहेब दुसऱ्या शहीद जवान सचिन साकेच्या पुतळ्यांसाठी दोन्ही कुटुंबांनी स्वत: प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिलेे. त्यांची उपेक्षा कायम आहे.'' सीताबाई तळेकर, शहीदभाऊसाहेबची आई.