आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

931 बेेेेकायदा बांधकामांनी नगर शहराचा श्वास कोंडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अतिक्रमणांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे. त्यानिमित्ताने काही मालमत्तांच्या अतिक्रमणांची माहिती नव्याने पुढे येत आहे. परंतु शहराच्या विविध भागात बड्या धेंडांनी केलेल्या पक्क्या बेकायदा अतिक्रमणांबाबत बोलण्यास कोणीच तयार नाही. विविध भागात तब्बल ९३१ बेकायदा पक्की अतिक्रमणे असून त्यामुळे शहराचा श्वास कोंडला आहे. बड्या धेंडांची ही अतिक्रमणे पाडण्यास सत्ताधारी विराेधक महापालिका प्रशासनाला भाग पाडणार का, असा सवाल नगरकर उपस्थित करत आहेत. 
रुग्णालये, मंगल कार्यालये, हॉटेल्स, अपार्टमेंट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शोरूम अशी एकूण ९३१ बेकायदा पक्की अतिक्रमणे शहराच्या विविध भागात आहेत. त्यापैकी अनेक अतिक्रमणे पाडण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु सुस्तावलेले महापालिका प्रशासन या अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. केवळ नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करण्याचा आव प्रशासन आणते. 

मिस्किन मळा रस्त्यावरील एका हॉटेलचे अतिक्रमण पाडल्यानंतर बड्या धेंडांच्या या अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या हॉटेलचे अतिक्रमण पाडण्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या दालनात ठाण मांडले होते. त्यानंतर संबंधित हॉटेल पाडण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने दाखवली. त्यानंतर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यानिमित्ताने काही अतिक्रमणांची माहिती नव्याने पुढे आली आहे. शहराच्या विविध भागांतील १२० रुग्णालयांना महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यापैकी ५२ रुग्णालयांचे बांधकाम पाडण्याचे अंतिम अादेश देण्यात आले. परंतु हे आदेश केवळ कागदावर राहिले. अद्याप एकाही बेकायदा रुग्णालयावर कारवाई झालेली नाही. या रुग्णालयांवर कारवाई सुरू असल्याचे खोटे शपथपत्र उच्च न्यायालयासमोर सादर करून या रुग्णालयांना अभय देण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली आहे. 
 
नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते नागापूरपर्यंतच्या २०५ बेकायदा बांधकामांकडेदेखील प्रशासनाने साेयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. या महामार्गावर पश्चिम बाजूस १११, तर पूर्व बाजूस ९४ पक्की बेकायदा बांधकामे असून त्यांना नोटिसाही बजावण्यात आलेल्या आहेत. पुढील कारवाई करण्यास मात्र महापालिकेचा एकही अधिकारी पुढे येण्यास तयार नाही. अार्थिक लागेबांधे पूर्ण व्हावेत, यासाठीच नोटिसा बजावण्याचे सोपस्कार महापालिकेचे अधिकारी करत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी तब्बल ६०६ शॉपिंग कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट इतर बेकायदा इमारती आहेत. या इमारत मालकांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या, परंतु अनेेक वर्षे उलटूनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. एकीकडे हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब फेरीवाल्यांची अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात हटवण्यात येत आहेत, तर दुसरीकडे बड्या धेंडांच्या ९३१ बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्याचे काम प्रशासन करत असल्याने महापालिकेच्या धोरणाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कोरगावकर यांना आव्हान 
शिवसेनेचे नगरसेवक योगिराज गाडे यांच्या मालकीचे हॉटेल यश पॅलेसचे काही बांधकाम अनधिकृत असून ते तातडीने पाडावे, अशी मागणी विरोधकांनी केली. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्याने तर शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाच आव्हान दिले आहे. हॉटेलचे बांधकाम पाडण्यासाठी आयुक्तांच्या दालनात चार तास ठाण मांडून बसणारे कोरगावकर बड्या धेंडांची इतर अतिक्रमणे पाडण्यासाठी पुन्हा ठाण मांडणार का, असा सवाल त्याने केला. 

माहिती असूनही कारवाई नाही 
रुग्णालयांनीपार्किंगसाठी सोडलेल्या जागेवर बेकायदा मेडिकल लॅब सुरू केल्या आहेत. शॉपिंग कॉम्प्लेक्स अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे व्यावसायिक गाळे दुकाने सुरू आहेत. महापालिका प्रशासनाला त्याबाबत सर्व माहिती असतानाही एकाही इमारत रुग्णालयावर अद्याप कारवाई झालेली नाही. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये, या भीतीपोटी शहरातील धार्मिक स्थळांवर मात्र महापालिका प्रशासनाने हातोडा टाकला. 
 
बातम्या आणखी आहेत...