आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : बेकायदा आम्हीच ठरवणार; त्याला अभयही आम्हीच देणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीताबन मंगल कार्यालयाला परवानगी नसतानाही महापािलका कारवाई करत नाही. - Divya Marathi
सीताबन मंगल कार्यालयाला परवानगी नसतानाही महापािलका कारवाई करत नाही.
नगर - शहरातील बेकायदा बांधकाम ठरवणारे अन् त्याला अभय देणारे दुसरे-तिसरे कोणी नसून महापालिकेचेच संबंधित अधिकारी आहेत. त्यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे शहरात बेकायदा बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चिरिमिरी देताच हवी तशी बांधकाम परवानगी हवा तो पूर्णत्वाचा दाखला मिळतो. चिरीमिरी देणाऱ्या नागरिकांना मात्र वर्षभर खेट्या मारूनही बांधकाम परवानगी पूर्णत्वाचा दाखला मिळत नाही. महापालिका कारभाराचा हा खाक्या नगरकरांना आता नवीन नाही. त्यामुळेच शहरातील बेकायदा बांधकामे त्यांना अभय देणाऱ्यांच्या विरोधात थेट न्यायालयाकडे दाद मागितली जात आहे. 
 
शहरातील पार्किंगखाऊ रुग्णालयांची बेकायदा बांधकामे पाडून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने महापालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार महापालिकेने रुग्णालयांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे. यानिमित्ताने शहरातील बेकायदा बांधकामांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात ९२ हजार मालमत्ता असल्याची नोंद महापालिकेकडे आतापर्यंत होती. परंतु आता नव्याने करण्यात आलेल्या जीआयएस सर्व्हेत एक लाख हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली. यापैकी अनेक मालमत्ता नियमबाह्य बेकायदा आहेत. इमारत उभी राहत असताना त्याकडे दुर्लक्ष करायचे, अन् इमारत उभी राहिल्यानंतर बांधकाम परवानगी अथवा इतर नियमांवर बोट ठेवत संबंधित इमारत मालकांकडून पैसे उकळायचे, हा महापालिकेचा धंदा झाला असल्याचा आरोप नगरकर करत आहेत. महापालिकेचे अनेक अधिकारी बांधकाम व्यावसायिकांचे बटिक झालेले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना हवी तशी हवी तेव्हा बांधकाम परवानगी मिळते, सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र नियमांवर बोट ठेवले जाते. महापालिकेचा नगररचना अतिक्रमण हटाव विभागाच्या कृपेने शहरात हजारोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे उभी आहेत. दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचारी या बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. रुग्णालये, हॉटेल, मंगल कार्यालये, अपार्टमेंट, कॉम्प्लेक्स, तसेच इतर अनेक बेकायदा बांधकामे पाडण्याची वेळ महापालिकेवर का येत आहे, ही बांधकामे उभी राहत असताना महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी झोपले होते का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 
 
तक्रार अर्ज करूनही कारवाई नाही 
मार्केट यार्ड येथील नवजीवन कॉलनीजवळील सीताबन मंगल कार्यालयामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मनस्ताप होत आहे. या मंगल कार्यालया विरोधात नागरिकांनी मनपाकडे तक्रार अर्ज दिले. या मंगल कार्यालयाला परवानगी नसल्याचे स्वत: मनपानेच माहिती अधिकाराच्या अर्जात स्पष्ट केले आहे. या मंगल कार्यालयाविरोधात अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. हे बेकायदा मंगल कार्यालय उभे राहत असताना महापालिकेचे संबंधित अधिकारी झोपले होते का, असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. 
 
अधिकारी पाच ते दहा हजार घेतो 
मनपा हद्दीत काेणतेही बांधकाम करताना मनपाकडून रितसर बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, ज्या विभागामार्फत ही परवानगी दिली जाते, त्या विभागातील चिरीमिरीचा लौकिक एेकून सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवानगी घेताच इमारत उभी करणे पसंत करतो. या विभागात केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच चलती आहे. पाच ते दहा हजार मोजल्याशिवाय नगररचना विभागातील अधिकारी बांधकाम परवानगी देत नसल्याचा अनुभव अनेकांनी दैनिक दिव्य मराठीकडे व्यक्त केला. 
 
न्यायालयाचे आदेशच हवेत का? 
बेकायदा बांधकामांबाबत वारंवार तक्रार अर्ज देऊनही कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळेच काही सामाजिक कार्यकर्ते संबंधित बांधकामे महापालिकेच्या विरोधात थेट न्यायालयाकडे दाद मागत आहेत. पार्किंगखाऊ रुग्णालयांवर सुरू असलेली कारवाई हे त्याचेच उदाहरण आहे. जोपर्यंत न्यायालयाचे आदेश येत नाहीत, ताेपर्यंत बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी महापालिकेचे संबंधित अधिकारी पुढे येत नाहीत. त्यामुळेच नागरिक महापालिका कारभाराच्या विरोधात संताव व्यक्त करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...