आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीखोरांच्या ‘स्वामी’पुढे कायद्याचे हात थोटेच, कँटोन्मेंट अधिकारी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कँटोन्मेंट परिसरातील टोल नाक्यांवरील ट्रकचालकांकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. कारण वस्तू सेवा कर (जीएसटी) एक जुलै रोजी लागू झाल्यावर देशभरातील कँटोन्मेंट परिसरातील सर्व नाके बंद करण्यात आले. ते सात ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू झाले. मात्र, या बंदच्या दरम्यानही भिंगार कँटोन्मेंटच्या हद्दीतील सोलापूर रोड, कल्याण-विशाखापट्टणम् महामार्ग (भिंगार रोड) जामखेड रस्ता अशा तीन ठिकाणी टोलवसुली (खंडणी) सुरूच होती, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. राजरोसपणे झालेल्या या लुटीला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
 
शुक्रवारी रात्री नगर-सोलापूर रस्त्यावर वाहन-चालकांकडून टोलच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी पकडले. ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली. वास्तविक पाहता एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यामुळे देशभरातील कँटोन्मेंटच्या हद्दीतील टोलनाके सरकारच्या आदेशाने बंद झाले, तरीही बंदच्या काळात नगरला मात्र कँटोन्मेंटचे वरिष्ठ अधिकारी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने तिन्ही टोलनाक्यांवर टोलच्या नावाखाली खंडणीची वसुली सुरूच होती. 
 
विशेष म्हणजे, ही वसुली रात्रीच्या वेळी केली जात होती. दिवसा सर्व बंद असायचे. दिवसा या टोलनाक्यांवर भगवे कपडे घालून टोळके बसलेले असायचे. उत्तर दक्षिण भारताला जोडणाऱ्या रस्त्यावर नगर हे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे येथून उत्तर ते दक्षिण जाणाऱ्या ट्रक वाहतुकीचे प्रमाण अतिशय मोठे आहे. या ट्रकचालकांपुढे फक्त वेळेवर माल पोहोचवण्याचे उद्दिष्ट असते. त्यामुळे टोलनाके सुरू आहेत, की नाहीत, यापेक्षा येथून पटकन निघणे, यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे टोल सुरू आहे, की नाही याची खात्री करता ते निमूटपणे पैसे देऊन तेथून निघून जात होते. जेव्हा टोल सुरू असतो, तेव्हाही घाईमुळे ६० रुपयांचा कर असताना त्यांच्याकडून सहाशे रुपये वसूल होत असताना त्यांनी त्याबद्दल कधीही अधिकृतपणे तक्रार केली नाही. ज्या ट्रकचालकांनी विरोध केला, त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत. ते दडपण्यात संबंधितांना यश आले. पोलिसांनीही या खंडणीखोरांच्या मागे असलेल्या ‘मास्टर माईंड’ असणाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कारण यामागे मोठे अर्थकारण होते. त्यामुळे खंडणीखोरांचे धाडस वाढतच गेले आहे. 
 
या खंडणीखोरीमागे भिंगार परिसरातील एक ‘टोल माफिया’ असल्याचे सर्वांना माहिती आहे. कँटोन्मेंट पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले त्याचे संबंध यामुळे कँटोन्मेंटच्या नाक्यांवर वसुलीचे काम त्यालाच मिळत आहे. अनेकदा दुसऱ्याच्या नावावर ठेका घेऊनही प्रत्यक्षात वसुली मात्र तोच करत होता. 

‘मोक्का’ लावण्याची गरज 
नगरहून उत्तर-दक्षिण भारतात जाणाऱ्या ट्रकची संख्या काही हजारांत आहे. फक्त सोलापूरकडून नगरमार्गे मनमाडकडे दररोज दिवसभरात सुमारे पाच ते सहा हजार ट्रक जातात. फक्त रात्री या मार्गावरून किमान दोन हजार ट्रक जातात. त्यांच्याकडून प्रत्येकी किमान सहाशे रुपये वसूल केले जात होते. जीएसटी बंद झाल्यानंतर दोन महिने नऊ दिवस वसूल केलेली खंडणीची रक्कम कोणाच्या घशात गेली तिची वसुली होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या संघटित गुन्हेगारी विरोधात ‘मोक्का’ अंतर्गतच कारवाई होण्याची गरज आहे. 
 
कँटोन्मेंट अधिकारी काय करतात? 
जीएसटीसुरू झाल्यानंतर कँटोन्मेंटचे टोलनाके बंद झाले. याची माहिती कँटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना नव्हती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक जुलैपासून सप्टेंबरपर्यंत ही वसुली सुरू होती. त्याची माहिती कँटोन्मेंटच्या अधिकाऱ्यांना नव्हती का? असली, तर त्यांनी कारवाई का केली नाही? हीच बाब कँप पोलिस ठाण्याच्या बाबतीत आहे. ट्रकचालकांकडून खंडणी वसूल केली जात असताना भिंगारचे पोलिस झोपले होते का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण खंडणीखोरांविरोधात अखेर स्थानिक गुन्हे शाखेला कारवाई करावी लागली होती. 
 
ट्रकचालकांनी मार्ग बदलले 
नगरशहर परिसरात कँटोन्मेंट नाके असताना त्यानंतरही अशी खंडणी वसुली होत होती. या शिवाय अनेक ठिकाणी काही तरुणही या ट्रक चालकांची लूट करत आहेत. ही रक्कम थोडी असल्याने ते तक्रार करत नाहीत. या शिवाय ‘झीरो’ पोलिस महामार्ग पोलिसांकडूनही या ट्रक चालकांना होणाऱ्या आर्थिक त्रासामुळे अनेक ट्रक चालकांनी आपले मार्ग बदलले आहेत. नाक्यावर बळजबरीने वाहनचालकांची लुटमार होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही नित्याची झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...