आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव क्षेत्र विकास; चारशे कोटींचा प्रस्ताव, सभा ठरली निवडणुकीची रंगीत तालीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेची अखेरच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. - Divya Marathi
महापालिकेची अखेरच्या सभेत विविध विषयांवर चर्चा झाली.
अकोला - महापालिकेच्या शेवटच्या ठरणाऱ्या महासभेने चार जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या २४ गावात विविध विकास कामे करण्यासाठी ४०० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुर केला. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. या महासभेत या विषयांसह विविध विषयांना मंजुरी दिली. 
 
हद्दवाढीच्या घोषणे नंतर राज्य शासनाने हद्दवाढ झालेल्या क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याची सुचना प्रशासनाला केली होती. यानुसार प्रशासनाने २५० कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी महासभेकडे पाठवला होता. मागील एक महिन्यापासून हा प्रस्ताव महासभेकडे धुळखात पडून होता. तब्बल एक महिन्या नंतर आचार संहिता लागू होण्यापूर्वी या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला प्रारंभ झाल्या नंतर इतिवृत्तावर अधिक वेळ खर्च झाल्या नंतर विषय पत्रिकेतील विषयांवर चर्चा सुरु झाली. या प्रस्तावावर चर्चा करताना उपमहापौर विनोद मापारी, गजानन गवई, अरुंधती शिरसाट यांनी प्रशासनाने तयार केलेला हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याचा आरोप करीत, या प्रस्तावात महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील अनेक गावांचा तसेच ज्या गावांचा समावेश झाला. त्या गावातील विविध विकास कामांचा समावेशच नसल्याने हा प्रस्ताव कॅबिन मध्ये बसुन तयार केला का? असा प्रश्न केला. विजय अग्रवाल यांनी पुन्हा विविध विकास कामांचा समावेश असलेला प्रस्ताव महापौरांकडे सादर करुन या कामांचा समावेश करुन प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी केली. अखेर विविध नगरसेवकांनी सुचवलेली विकास काम तसेच पाच जानवारी ला सायंकाळ पर्यंत येणाऱ्या कामांचा समावेश करुन ४०० कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्याचा निर्णय महासभेने घेतला. याच बरोबर नाका मोहरील सुरेंद्र जाधव यांची आर्णी नगरपालिकेत समकक्ष पदावर बदली करणे, श्री शिवाजी पार्कचे राजे शिवछत्रपती उद्यान म्हणुन नामकरण करणे, जन्म दाखला देण्याबाबत सुधारणा करणे यासह वेळेवर येणाऱ्या विषयांना महापौर उज्वला देशमुख यांनी मंजुरी दिली. 
 
सभा ठरली निवडणुकीची रंगीत तालीम  
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याच्या शक्यतेमुळे अखेरची ठरलेली महासभा शांततेत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु साडेसात वर्ष सत्तेत असलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करीत पुन्हा माईक फोडला तर पोडियमला जमिनीवर आदळले. दरम्यान सत्ताधारी गटानेही विरोधकांचा हल्ला जोरदार परतवुन लावला. त्यामुळे चार जानेवारीची महापालिकेची अखेरची सभा ही निवडणुकीतील प्रचाराची रंगीत तालीम ठरली. 

महासभेला प्रारंभ होताच महापौरांनी सर्वांचे आभार मानण्यासाठी मनोगत व्यक्त केले. या मनोगता नंतर माजी महापौर मदन भरगड यांनी सत्ताधारी गटाचा खरपुस समाचार घेण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती आदी सर्वच आघाड्यांवर सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप करीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या घोषणा आणि भूमिपूजन म्हणेज मंुंगेरीलाल के हसीन सपने असा प्रकार असल्याची टिका केली. शहरात जी विकास कामे सुरु आहेत. ती कामे तत्कालीन आघाडी शासनाने दिलेल्या निधीतून सुरु आहेत. याचे केवळ श्रेय सत्ताधारी घेत आहेत. राज्य शासनाने अद्याप एक रुपयाही शहराच्या विकास कामांसाठी दिलेला नाही,असेही ते म्हणाले. याचा जाब तुम्हाला मतदार देतील, असेही ते म्हणाले. माजी महापौरांच्या या वक्तव्यांचा समाचार महापौर उज्वला देशमुख यांनी घेतला. त्या म्हणाल्या तुमच्या साडेसात वर्षाच्या कार्यकाळात निधी उपलब्ध असताना नियोजनाच्या अभावामुळे निधी परत गेला. तुमच्या कार्यकाळातील घाण साफ करण्यातच एकवर्ष गेले. तर विजय अग्रवाल म्हणाले,मागील ५० वर्षात जो विकास झाला नाही, तो विकास भाजप शासनाच्या काळात झाला,असे स्पष्ट करीत कोणत्या योजनेत किती निधी आला? याचा पाढाच त्यांनी सभागृहासमोर मांडला. तर भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनीही सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. खासदारांच्या पत्रामुळे भूमिगत गटार योजनेचे काम थांबले, दररोज भूमिपूजनाचे कार्यक्रम घेता, प्रत्यक्ष काम केव्हा सुरु होणार? जनता खुळी नाही, ही कामे म्हणजे आश्वासनांचा पाऊस असल्याचे ते म्हणाले. तसेच महापालिका अस्तित्वात आल्यापासून रखडलेल्या छत्रपती प्रवेशद्वाराच्या कामासाठी विरोधी गटाने सत्तेत असताना प्रवेशद्वार बांधले नाही तसेच विरोधी बाकावर असताना सभागृह डोक्यावर घेतले नाही.आता मात्र प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाल्या नंतर केवळ प्रवेशद्वारावर नाव टाकण्याच्या मागणीसाठी सभागृहाचा वेळ खर्च केला. तर महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याच्या प्रस्ताव रद्द केल्या नंतरही या विषयावर राजकारण करण्यात आले. हा प्रस्ताव कोणी आणि कशासाठी आणला? असा प्रश्न विरोधकांनी केला. हा प्रस्ताव कोणी आणला आणि प्रस्ताव आणल्या बद्दल विजय अग्रवाल यांनी दिलगीर व्यक्त केल्यानंतरही केवळ याच विषयावर विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेऊन महापालिका क्षेत्रात दारुबंदीची मागणी केली. 
 
२० कोटींच्या देवाण -घेवाणीचा थेट अाराेप 
रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याबाबत कॉग्रेसच्या काही नगरसेवकांनी थेट २० कोटी रुपयाची देवाण -घेवाण यात होणारहोती, असा थेट आरोप केला.ही बोलणी फिस्कटली यामुळेच हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी रद्द केला,असा आरोपही केला. हे सर्व आरोप प्रत्यारोप निवडणुकीत होत असतात, त्यामुळेच शेवटची सभा निवडणुकीतील सभांची रंगीत तालीम ठरली. 
 
पुन्हा तोडफोड 
अडीच वर्षाच्या काळात विरोधकांनी पाच वेळा माईकची तोडफोड केली.पोडीयमही लोटुन दिले. शेवटच्या सभेतही विरोधकांनी माईकची तोडफोड केली. त्यामुळे माईकची तोडफोड करुन विरोधकांनी नेमके काय मिळवले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

महापौरांनी मानले आभार 
महापौर उज्वला देशमुख यांनी शहराचा सर्वागिण विकास करण्याचा प्रयत्न अडीच वर्षाचा कार्यकाळात केला. यात अनेकांचे सहकार्य लाभले तर काहींची नाराजीही पत्करावी लागली. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळेच ही बाब शक्य झाली, असे सांगून त्यांनी सहकार्य दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानले. 

साडेसात वर्ष दुर्लक्ष आता राजकारण : साडेसातवर्ष सत्तेत असलेल्या कॉग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार तर उभारलेच नाही. या वर्षात भाजप-सेनेच्या सत्ताकाळात प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ प्रवेशद्वारावर नाव टाकण्याचे काम राहिले आहे. मात्र कॉग्रेसच्या नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर अद्याप नाव टाकण्याच्या मुद्यावर राजकारण करीत, डाळ शिजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. 

तर चर्चा करती आली असती : हद्दवाढक्षेत्रातील विकास कामांचा प्रस्ताव प्रशासनाने एक महिन्यापूर्वीच महासभेकडे पाठवला होता. या महत्वपूर्ण विषयावर त्वरित सभा घेऊन यात बदल करणे, विकास कामे सुचवणे यासाठी नगरसेवकांना वेळ मिळाला असता. परंतु तसे झाल्याने या विषयावर फारशी चर्चाही झाली नाही आणि नगरसेवकांना कामे सुचवण्यासाठी संधीही मिळाली नाही. 
बातम्या आणखी आहेत...