नगर- बहुचर्चित जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याच्या सुनावणीत मंगळवारी सहायक तपासी अधिकारी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची सरतपासणी सुरू झाली.
सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांची सरतपासणी सुरू झाली आहे. सकाळी साडे अकराला त्यांची साक्ष नोंदवण्याचे काम सुरू झाले. एपीआय गोर्डे यांची साक्ष नोंदवण्यास आक्षेप घेत आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दिला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला.
पंचांच्या साक्षीअगोदर सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांची साक्ष नोंदवू नये. त्यांची साक्ष अगोदर घेतल्यास आरोपींच्या हक्काला बाधा पोचेल, असा मुद्दा त्यांनी मांडला होता. या अर्जावर विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी तीव्र आक्षेप घेतला.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या खटल्यातील साक्षीदारांची यादी नोव्हेंबर २०१६ मध्येच देण्यात आलेली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अॅड. यादव यांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा अर्ज फेटाळून लावला.