नगर - जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी आरोपी प्रशांत जाधव यानेच (मूळ फिर्यादी) पोलिसांना मृत संजय जाधवचा मोबाइल, मोटारसायकल व रक्ताचे डाग असलेली एक काठी दाखवली, तसेच बोअरवेलच्या पाइपमध्ये अडकलेले शीर व कापलेले पायही त्यानेच ओळखून ते सुनीलचे असल्याचे पोलिसांना सांगितले, अशी महत्त्वपूर्ण साक्ष एका पंचाने गुरुवारी न्यायालयात दिली. त्याची उलटतपासणी मात्र गुरुवारी होऊ शकली नाही.
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर ९ जानेवारीपासून जवखेडे तिहेरी हत्याकांडाची नियमित सुनावणी सुरू आहे. गुरुवारी विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी एका पंचाची सरतपासणी घेतली. या पंचासमोरच संजय जाधवचा मोबाइल, मोटारसायकल, लाकडी काठी व सुनीलचे अवयव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याबाबतच्या जप्ती पंचनाम्यावर त्याच्या स्वाक्षऱ्या होत्या. या पंचाची सरतपासणी दोन तास चालली.
२२ आॅक्टोबर २०१४ रोजी सकाळी पोलिस निरीक्षक अनमुलवार यांनी संजय जाधवचा मोबाइल जप्त केला. तो संजयचाच असल्याचे प्रशांत जाधवने पोलिसांना सांगितले. या मोबाइलची कंपनी, त्यात दोन सिमकार्ड असल्याचे पंचाने साक्षीत सांगितले. न्यायालयात हा मोबाइल, तसेच आरोपी प्रशांत जाधवलाही पंचाने ओळखले. नंतर दुसऱ्या ठिकाणी सापडलेल्या राजदूत मोटारसायकलीचा पंचनामा केल्याचे पंचाने सरतपासणीत सांगितले.
मोटारसायकलही संजयची असल्याचे प्रशांतनेच सांगितले होते. पोलिसांना ती सुरू होत नसल्याने प्रशांतनेच ती चालू करून दिली. दुचाकीचे सीट काढून त्याखालच्या कप्प्यात त्याने पेट्रोल टाकून ती सुरू केली, असेही पंच म्हणाला.
आईला बाहेर काढले
सुनावणीच्या वेळी आरोपी प्रशांत जाधवची आई न्यायालयात होती. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. नंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार या महिलेला न्यायालयाबाहेर पाठवण्यात आले. यादीत असलेले एक पंच गुरुवारी साक्षीला उपस्थित नव्हते. सरकारी वकिलांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे त्यांची साक्ष आता होणार नाही.