आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड; उलटतपासणीत फौजदाराची तारांबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
नगर - जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात शवविच्छेदन पंचनामा करणाऱ्या तत्कालीन फौजदाराची बुधवारी उलटतपासणीत चांगलीच तारांबळ उडाली. ३४ वर्षे सेवेचा अनुभव असूनही उलटतपासणीत बहुतांश प्रश्नांची उत्तरे देताना ते अडखळत होते. सरतपासणीत त्यांनी सांगितलेल्या काही बाबींचा पंचनाम्यात उल्लेख नसल्याचेही समोर आले. तब्बल २ तास त्यांची उलटतपासणी चालली. त्यानंतर फिर्याद नोंदवणाऱ्या तत्कालीन सहायक निरीक्षकाची साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली.  

प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्यासमोर सोमवारपासून जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी मंगळवारी तत्कालीन फौजदार कृष्णा जोपळे यांची अवघ्या १५ मिनिटांत सरतपासणी घेतली. मात्र, स्टेशन डायऱ्यांअभावी त्यांची उलटतपासणी तहकूब करण्यात आली होती. बुधवारी आरोपींच्या वतीने अॅड. सुनील मगरे यांनी त्यांची दोन तास उलटतपासणी घेतली.  

‘आपण पोलिसांच्या वाहनातून २१ ऑक्टोबर २०१४ रोजी घटनास्थळी गेलो,’ असे जोपळे म्हणाले. घटनास्थळ प्रतिबंधित करूनही तेथे गर्दी जमल्याचे त्यांनी मान्य केले. संजय जाधवच्या डाव्या बरगडीची जखम, हातातील कडे, मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर ब्लँकेटवर ठेवल्याचे, तिन्ही मृतदेहांना विहिरीतील गाळ, गवत चिकटलेले होते या बाबी पंचनाम्यात नमूद नसल्याचे फौजदार जोपळे यांनी मान्य केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटी रुग्णालयाकडे सोपवताना जप्ती पंचनामा केला नव्हता. कारण मृतांच्या अंगावर त्या वेळी काहीच नव्हते, असे जोपळे म्हणाले. शवविच्छेदन झाल्यावर प्रशांत जाधवकडे मृतदेह सोपवून ताबा पावती घेतली. त्यातही इतर चीजवस्तूंचा उल्लेख नसल्याचे जोपळे यांच्या उलटतपासणीत समोर अाले.   

अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार  
मूळ फिर्यादीत प्रशांत जाधवने म्हटले होते की, त्याचे चुलते संजय जाधव, चुलती जयश्री जाधव, चुलतभाऊ सुनील यांचा अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी, तीक्ष्ण हत्याराने खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे म़ृतदेह दौलत जाधवच्या शेतातील विहिरीत टाकून दिले. या मूळ फिर्यादीवरून सहायक निरीक्षक सचिन जाधव यांनी खुनाचे, पुरावा नष्ट करण्याचे कलम लावल्याचे सांगितले. त्यांची उलटतपासणीही बुधवारी दुपारच्या सत्रामध्येच पूर्ण झाली.