आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे तिहेरी हत्याकांड: दोन मिनिटांत उतरला विहिरीत, अन् एका हाताने धुतली हत्यारे!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील बहुचर्चित तिहेरी हत्याकांड केल्यानंतर आरोपी प्रशांत जाधवने जवळच्या शेतात असलेल्या विहिरीत उतरून हत्यारे धुतली होती. याचे प्रात्यक्षिकही प्रशांतने पोलिसांना करून दाखवले. ते पाहून पोलिसही अचंबित झाले होते. तसेच त्याने मृत सुनीलच्या कपड्यांची मोबाइलची कशी विल्हेवाट लावली, तेही पोलिसांना प्रात्यक्षिकासह दाखवले, अशी माहिती या दोन्ही घटनास्थळांचा पंचनामा करताना उपस्थित असलेले तलाठी भास्कर मोरे यांनी सरतपासणीत सांगितली.
 
जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील हे काम पहात आहेत. बुधवारी एका पंचाची साक्ष नोंदवल्यानंतर गुरुवारी त्यांनी तलाठी मोरे यांची सरतपासणी घेतली. आरोपी प्रशांत जाधवने पोलिस कोठडीत असताना मृत सुनीलचे कपडे कोठे जाळले, त्याच्या मोबाइलची कशी विल्हेवाट लावली, याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही घटनास्थळांचा पंचनामा केला होता. त्यावेळी तलाठी मोरे उपस्थित होते.
 
तत्कालीन उपअधीक्षक वाय. डी. पाटील गुन्हे शाखेचे पोलिस आरोपी प्रशांतला घेऊन जवखेडे येथे गेले. गावातील घरामागे असलेल्या उकीरड्यावर सुनील, त्याचे वडील स्वत:च्या अंगावरील कपडे जाळले होते, असे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष फावड्याने उकीरडा खोदून पाहिला. त्यात मृत सुनीलचा अर्धवट जळालेला निळ्या रंगाच्या टी-शर्टचा तुकडा सापडला. पोलिसांनी हा तुकडा राखेचे नमुने घेऊन लिफाफ्यात सीलबंद केले न्यायवैद्यकीय प्रयाेगशाळेत पाठवले. त्यानंतर आरोपी प्रशांतने सुनीलच्या मोबाइलची कशी विल्हेवाट लावली, याचे प्रात्यक्षिक दाखवले.
 
सुनीलच्या मोबाइलमधील सीमकार्ड बॅटरी काढून त्याने मळ्यातील घराजवळच्या शेतात टाकले. पंचनाम्यात मात्र हे पुरावे पोलिसांना गवसले नाहीत. माेबाइल मात्र प्रशंातने दोन दिवस स्वत:कडेच ठेवला. नंतर तिन्ही मृतदेहांचा अंत्यविधी झाला, त्यावेळी फुले वाहताना मोबाइल जळत्या चितेत कसा टाकला, याचे प्रात्यक्षिकच त्याने दाखवले. पोलिसांनी ते ठिकाणही पाहिले मात्र तेथे मोबाइलचे अवशेष मिळाले नसले, तरी या घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला.

नंतर प्रशांतने हत्याकांड झाल्यानंतर हत्यारे कोठे धुतली होती, हे सांगितले होते. त्यानुसार पोलिस प्रशांत पंचांना घेऊन त्याने दाखवलेल्या विहिरीजवळ गेले. या विहिरीतच प्रशांतने हत्यारे धुतली असे नमूद केले. मात्र, विहीर पाहून पोलिसांनाही विश्वास बसेना. मात्र, प्रशांतने पोलिसांना प्रात्यक्षिकच करून दाखवल्याचे पंच मोरे म्हणाले. त्यासाठी पोलिसांनीही दोरखंड बांधून प्रशांतला आत सोडले. तत्पूर्वी दोन पोलिस आधीच विहिरीत उतरले होते. प्रशंातच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली होते, असे मोरे म्हणाले. दुपारच्या सत्रात मोरे यांची उलटतपासणी देखील पूर्ण करण्यात आली.
 
सरसर विहिरीत उतरला
मृतसंजय जाधव यांच्या शेताजवळ असलेल्या दुसऱ्या शेतात एक दगडाने बांधलेली विहीर आहे. तिला कठडे नाहीत, जवळपास झाडही नाही, तरीही खाचांच्या मदतीने विहिरीत उतरून हत्यारे कशी धुतली, याचे प्रात्यक्षिकही प्रशांतने दाखवले. अवघ्या दोन मिनिटांत तो विहिरीत उतरला. एका हाताने खाचेला धरून त्याने दुसऱ्या हाताने हत्यारे धुतली अन् वर आला. पंचनाम्याच्या वेळी केलेल्या हे प्रात्यक्षिक पाहून पोलिस पंचही अचंबित झाले. हा प्रकार जसाच्या तसा पंचांनी न्यायालयात कथन केला.
 
उलटतपासणीही पूर्ण
सरकारतर्फे अॅड. यादव पाटील यांनी सरतपसणीत तपशीलवार बारीकसारीक मुद्यांची उकल केली. त्याबद्दल प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश कोळी यांनीही त्यांचे कौतूक केले, तर आरोपींच्या वतीने अॅड. सुनील मगरे यांनी पंच मोरे यांची उलटपासणी घेतली. पंचनाम्याचे लेखी आदेश होते का, उपअधीक्षक सोबत होते का, सोबत असलेले पोलिस शस्त्रधारी होते का, तलाठी होते तर तुम्हाला सर्व परिसर आेळखीचा होता का, अशी विचारणा त्यांनी केली. पुढील सुनावणी २२ २३ नोव्हेंबरला होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...