आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड खटला: प्रशांत जाधवच्या घरातच सापडली होती हत्यारे, सरकारी पंचाची साक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन केलेल्या झडतीमध्ये आरोपी प्रशांत जाधव (तत्कालीन फिर्यादी) याच्या घरात धारदार शस्त्रे सापडली होती, अशी महत्वपूर्ण बाब सरकारी साक्षीदार अमर शेंडे यांनी आपल्या सरतपासणीत सांगितली. कामगार तलाठी असलेले शेंडे या पंचनाम्याला उपस्थित होते. या पंचनाम्याची सविस्तर तपशील त्यांनी न्यायालयात कथन केला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात शेंडे यांच्यासह एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सरतपासणी घेतली. प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. 
 
जवखेडे हत्याकांडानंतर काही दिवसांनी पोलिसांनी तत्कालीन फिर्यादी प्रशांत जाधव याच्या घरझडतीसाठी न्यायालयाची परवानगी घेतली. तलाठी शेंडे यांच्या उपस्थितीत तब्बल साडेसात तास प्रशांतच्या घराची झडती झाली. प्रशांत जाधव, त्याचा भाऊ अशोक आणि वडील दिलीप जाधव तसेच मृतांचे काही कपडे घरातून पोलिसांनी जप्त केले. झडतीत पोलिसांना एका लाकडी पलंगाखाली आक्षेपार्ह शस्त्रे मिळाली. धारदार कुऱ्हाड, लाकडी दांडा, कोयता, अर्धी करवत, कुऱ्हाड खोशा पोलिसांनी जप्त केला. 
 
सरतपासणीत शेंडे यांनी प्रशांत जाधवच्या घराचे, खोल्यांचे, घरातील कपाट, विविध वस्तूंचे तपशीलवार अचूक वर्णन सांगितले. कोणत्या दिशेने झडती सुरू झाली, कशी झाली, कोठे संपली, त्यावेळी घरात पुरेसा प्रकाश असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय बॉम्बशोधक पथकाने केलेल्या तपासणीत एक मोबाईलचे कव्हर सुटे भाग सापडले. तेही पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेली हत्यारे इतर मुद्देमाल शेंडे यांनी न्यायालयात अचूक ओळखला.तत्पूर्वी सकाळच्या सत्रामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी एस. जी. लोखंडे यांची सरतपासणी उलटतपासणी झाली. सरतपासणीत त्यांनी जवखेडे येथील एका व्यक्तीच्या मृत कुत्र्याच्या शवाचा पंचनामा केल्याचे शवविच्छेदन केल्याचे सांगितले. पांड्या नावाचा हा कुत्रा कोठे होता, त्याचे वर्णन, तपासणीसाठी घेतलेले नमुने यांचे तपशील कथन केले. 
 
१६ साक्षीदार तपासले 
जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी आतापर्यंत १६ साक्षीदार तपासले आहेत. सरकारी साक्षीदारांची यादी एकूण १६४ जणांची असली, तरी बहुतांश साक्षीदारांचा तसा फारसा संबंध नाही. यापूर्वीही त्यांनी असे साक्षीदार वगळले होते. सोमवारीही साक्षीदार वगळण्याचा अर्ज त्यांनी न्यायालयात दिला. या खटल्यात आजही दोन साक्षीदारांची सरतपासणी घेतली जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...