आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांच्या भीतीमुळे तिने रंगवली अपहरणाची कहाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- घरातून निघाल्यानंतर रस्ता चुकून अकरा वर्षांची मुलगी शहरात भटकत होती. ताेवर पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा शोध सुरू केला. पालक रागावतील या भीतीने मुलीने स्वत:च्या अपहरणाची कहाणी त्यांना सांगितली. पालकांनी ही बाब गांभीर्याने घेत पोलिस ठाणे गाठले. पण तेथे मात्र मुलीने खरा प्रकार सांगितला अन् तिच्या स्वरचित अपहरण नाट्यामागील खरे कारण उजेडात आले.

ही मुलगी बागरोजा हडकाे परिसरात वास्तव्यास असलेल्या आजी-आजोबांकडे सुटीला आली होती. आजी रागावल्यामुळे ती घरातून बाहेर पडली. पण नगरचे रस्ते माहिती नसल्यामुळे ती भरकटली. तोपर्यंत घरचे काळजीत पडले. त्यांनी काही सुज्ञ नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध सुरू केला. दोन तासांनंतर मुलगी झोपडी कॅन्टीन परिसरात मिळाली. घरचे रागावतील म्हणून मुलीने अनोळखी व्यक्तींनी आपले अपहरण केल्याचे सांगितले. तिचे एेकून घरचे घाबरले. त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठले.

पोलिस ठाण्यात आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुलीला सविस्तर हकिकत सांगायला लावली. तिच्या बोलण्यात काही विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिला उलट प्रश्न विचारले. मुलीने अपहरणाची कहाणी स्वत:च रचल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसे थेट विचारताच तिने आपणच ही कहाणी रचल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांसह तिच्या पालकांचाही जीव भांड्यात पडला.
एवढा मनस्ताप झाल्यानंतर पालक मारतील, या भीतीने मुलीने अपहरणाची कहाणी रचली. पण खरा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनाही आपली चूक लक्षात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची स्टेशन डायरीला नोंद घेऊन मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. शहरात परिसरात बालकांच्या अपहरणाच्या अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...