आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी, तीस लाखांच्या खंडणीसाठी नोकराकडून मालकाचे अपहरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तीसलाख रुपयांच्या खंडणीसाठी एका सराईत गुन्हेगाराने तो सध्या कामावर असलेल्या मालकाचेच अपहरण केले. सुरेश लालचंद मुनोत असे अपहृत व्यापाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. पण, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या विशेष पथकासह तोफखाना पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवली, अन् १२ तासांच्या थरार नाट्यानंतर मुनोत यांची सुखरुप सुटका केली. पांढरी पुलानजीक गुंजाळे गावात व्यापाऱ्याला बांधून ठेवलेले होते. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, तर तिघे जण पसार झाले आहेत.
सादिक नवाब शेख (४५, मुकुंदनगर) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह गीताराम रमेश तांबे (गुंजाळे, ता. राहुरी) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपी मात्र पसार झाले आहेत. अपहृत सुरेश मुनोत यांची पाइपलाइन रस्त्यावर सागर हॉटेलशेजारी आनंद गॅस एजन्सी आहे. शुक्रवारी दिवसभर ते कामावर होते. सायंकाळी उशीर झाला तरी ते घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा विवेक मुनोत त्यांच्या शोधासाठी निघाला. काही लोकांनी त्याला सुरेश मुनोत हे सादिक शेखसोबत गेल्याचे सांगितले. पण, सादिकचाही तपास लागत नव्हता. त्यामुळे विवेकने तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, रात्री विवेकला सादिकचा फोन आला. ‘तुझे वडील आमच्या ताब्यात आहेत, आम्ही सांगताे तेवढे पैसे गुपचूप दे, माझी माणसं तुझ्याकडे येतील, त्यांच्याजवळ पैसे दे,’ अशी मागणी सादिकने विवेककडे केली. त्यामुळे विवेकने तोफखाना पोलिस ठाण्यात वडिलांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या विशेष पथकातील पोलिस हवालदार राजेंद्र वाघ, भरत डंगोरे, संगमनेरचे पोलिस कर्मचारी वाय. एल. शेख, तोफखान्याचे गणेश भिंगारदे, गायकवाड आदींचे पथक वेगाने कामाला लागले. त्यांनी सादिकचा माग काढायला सुरुवात केली.

शुक्रवारी रात्रभर पोलिस सादिकचा कसून शोध घेत होते. शनिवारी सकाळी सादिकने सुरेश मुनोत यांना पांढरी पुलानजीकच्या गुंजाळे गावाच्या शिवारात जंगलामध्ये लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मुनोत यांना एका टाटा एस वाहनामध्ये डांबून ठेवले होते. त्यांना मारहाणही केली होती. पोलिसांना पाहताच आरोपींनी धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी पाठलाग करून सादिक गीतारामला पकडले. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुनोत यांच्या सुटकेची माेहीम फत्ते झाली. मात्र, गुन्ह्यातील इतर तिघे आरोपी पसार झाले आहेत.
अारोपींच्या ताब्यातून एक टाटा एस वाहन, ३० हजार रुपयांची रोकड, बांधून ठेवण्यासाठी वापरलेली दोरी, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गुन्ह्यात गावठी पिस्तुलाचा वापर झाल्याची माहितीही समोर आली आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींना तोफखाना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी भेट दिली. त्यांनीही आरोपींची कसून चौकशी केली. तोफखान्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांना त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या. तसेच इतर आरोपींच्या शोधाकरिता तपास पथक रवाना केले.

मुनोतयांचे हाड फ्रॅक्चर
सुरेशमुनोत यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या संपत्तीबाबत आरोपी वारंवार सखोल विचारणा करत होते. तुझ्या मुलाला गुपचूप पैसे द्यायला सांग, असेही धमकावत होते. मुनोत यांच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. धाकामुळे मुनोत यांनी विरोध केला नाही. आरोपींनी केलेल्या बेदम मारहाणीत मुनोत यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
सर्व आरोपी सराईत
मुनोतयांच्या अपहरणाचा कट रचणारा सादिक शेख हा सराईत आरोपी आहे. त्याच्यावर यापूर्वी एका दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. दीड वर्षापूर्वी मुकुंदनगर परिसरात दोन गटांत झालेल्या दंगलीतही तो आरोपी होता. नगरसेवक समद खान याच्या टोळीवर त्याने हल्ला केला होता. गीताराम तांबे हा गुंजाळे परिसरातील असून त्याच्यावरही आर्म अॅक्टच्या गुन्ह्याची नोंद आहे. याशिवाय पसार झालेले तीन आरोपीही गावठी पिस्तूल प्रकरणात गोवलेले आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पैशांवर डोळा
मुनोतयांची पाइपलाइन रस्त्यावर आनंद गॅस एजन्सी आहे. सादिक शेख हा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडेच कामाला होता. त्याला मुनोत यांच्या सर्व व्यवहारांची कल्पना होती. त्यामुळे त्याने मुनोत यांच्या अपहरणाचा कट रचला. गुन्हेगारी विश्वातील काही साथीदारांना सोबत घेऊन त्याने सुरेश मुनोत यांचे अपहरण केले. त्यांना टाटा एस वाहनात टाकून गुंजाळे शिवारात नेले. या वाहनात गाद्या टाकलेल्या होत्या. त्यातच मुनोत यांचे तोंड बांधून त्यांना कोंडून ठेवलेले होते.

नेटवर्क कामी आले
मुनोतयांच्या सुटकेच्या थरारनाट्यात सहभागी झालेले पोलिस चांगलेच अनुभवी आहेत. हवालदार राजू वाघ, भरत डंगोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेतील कामाचा दांडगा अनुभव आहे. याशिवाय संगमनेरला नेमणूक असलेले वाय. एल. शेख यांनीही यापूर्वी शहर उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांच्या पथकात काम केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची त्यांना चांगली माहिती आहे. या सर्वांचा अनुभव खबऱ्यांचे नेटवर्कही या कारवाईत कामाला आले.
बातम्या आणखी आहेत...