आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटला : आरोपींवर आज हाेणार दोषनिश्चिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर झालेले अत्याचार खून प्रकरणातील तिन्ही आरोपींवर बुधवारी न्यायालयात दोष निश्चितीची प्रक्रिया राबवली जाईल. आरोपींना मंगळवारी न्यायालयात आणले नसल्यामुळे दोषनिश्चिती होऊ शकली नाही. या तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याच्या जामीन अर्जावरही बुधवारीच निर्णय होणार आहे. भैलुमेचा दोषमुक्त करण्याचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत उच्च न्यायालयात अपील दाखल झालेले नव्हते.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सोमवारपासून कोपर्डी प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सोमवारी या प्रकरणातील तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या घराला पोलिसांनी सील लावले नसल्याचे, तसेच तेथे जाण्यास कोणालाही मज्जाव केले नसल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आरोपी भैलुमे याला जामीन देण्यास विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी तीव्र विरोध दर्शवला. भैलुमेच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचे वकील प्रकाश आहेर हे सुनावणीला गैरहजर होते.

दुपारी साडेतीन वाजता सुनावणीला सुरूवात झाली. आरोपींचे वकील गैरहजर असल्याचे सांगत त्यांच्या सहायक वकिलांनी तसा लेखी अर्ज न्यायालयात सादर केला. आरोपी भैलुमे याच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात सायंकाळपर्यंत दोषनिश्चितीचे अपील दाखल केले जाणार असल्याचे अर्जात म्हटले होते. त्यामुळे एक दिवस सुनावणी तहकूब करावी, तसेच भैलुमेच्या जामीन अर्जावरील सुनावणीही एक दिवस तहकूब ठेवावी, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे विचारले. विशेष सरकारी वकील निकम यांनी त्यावर लेखी म्हणणे सादर केले.

खटला लांबवण्याचा प्रयत्न
आरोपींच्या वकिलांकडून अर्ज सादर करुन हा खटला लांबवण्याचा हेतूपुरस्पर प्रयत्न केला जात आहे, असा आक्षेप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी नोंदवला. दोषमुक्तीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपीला पुरेशी मुदत न्यायालयाने दिली होती. मात्र, वीस दिवस उलटूनही त्यांनी अद्याप अपील दाखल केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपींच्या वतीने वेळकाढूपणा केला जात आहे, असा युक्तिवाद अॅड. निकम यांनी केला. त्यामुळे तिन्ही आरोपींवर दोषनिश्चितीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयास केली.

आरोपींना आणलेच नाही
आरोपी भैलुमे याला दोषनिश्चितीच्या अर्जावर उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पुरेशी मुदत दिलेली होती. मात्र, अद्यापही त्यांनी अपील दाखल केले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे विशेष सरकारी वकिलांच्या विनंतीनुसार आरोपींविरुद्ध दोषनिश्चितीची प्रक्रिया सुरु करण्यास न्यायालयाने संमती दर्शविली. मात्र, सुनावणीला आरोपींना न्यायालयात आणलेले नव्हते. त्यावर आरोपींना का आणले नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी काही अडचणींमुळे आरोपींना आणले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

आजहोणार निर्णय
बुधवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात आणले जाईल. त्यांच्यावर खुनाचा कट रचणे, बलात्कार करुन खून करणे पोक्सा कायद्यानुसार दोषनिश्चिती केली जाईल. तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी भैलुमे याच्या वतीने यापूर्वी केलेला दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २० ऑक्टोबरलाच फेटाळला होता. भैलुमेच्या वतीने सादर केलेल्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाने विरोध दर्शवला आहे. सोमवारीच तसे लेखी म्हणणे अॅड. निकम यांनी न्यायालयात सादर केेले. या जामीन अर्जावर, तसेच त्याच्या घराचे सील काढण्याच्या अर्जावरही बुधवारी सुनावणी होणार आहे.

सहायक अभियोक्ता नियुक्त
कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे प्रकरण देशभर गाजले. हा संवेदनशील खटला आहे. त्यामुळे या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पाहतील, असे मुख्यमंत्र्यांनीच कोपर्डी येथील दौऱ्याच्या वेळीच जाहीर केले होते. त्यानुसार अॅड. निकम या खटल्यात सरकार पक्षाची धुरा सांभाळत आहेत. आता त्यांना साहाय्य करण्यासाठी नगरच्याच सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्पा कापसे-गायके यांची नियुक्ती शासनाने केली आहे. तसे लेखी पत्रही त्यांना मिळाले आहे. अॅड. कापसे यांनी यापूर्वीही अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये काम पाहिले आहे.
बातम्या आणखी आहेत...