आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटला, मुलीचे कपडे, सायकल पाहून आईच्या अश्रूंचा फुटला बांध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाईल फोटो - Divya Marathi
प्रोफाईल फोटो
नगर - कोपर्डी(ता. कर्जत) येथे अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईची साक्ष गुरुवारी नोंदवण्यात आली. न्यायालयात आरोपींना त्यांच्या चेहऱ्यावर संताप दिसला. सहआरोपीला ओळखताना पीडितेच्या अाईने त्याला टोणगा म्हणून संबोधले, तर पीडितेचे कपडे पाहून मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटून त्या ढसाढसा रडल्या, तरीही त्यांनी निर्भयपणे साक्ष नोंदवली. त्यांची उलटतपासणी पूर्ण झाली. आता पुढील सुनावणी १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होईल. 
 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडितेच्या आईची सरतपासणी घेतली. आपल्याला दोन मुली एक मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. पीडिता नववीत शिकत होती. ती शाळेत हुशार असल्याचे त्यांनी सांगितले. तिची घरातून शाळेत जाण्याची परत माघारी येण्याची वेळ त्यांनी सांगितली. 

१२ जुलै २०१६ ला ती शाळेत जाता दिवसभर घरातच झोपून होती, असे त्यांनी सांगितले. तिला बरे वाटत नसेल म्हणून मी काही विचारणा केली नाही. पण, दुसऱ्या दिवशीही ती घरातच झोपून होती. दिवसभर जेवली नव्हती. सायंकाळी वाजता मला मोठ्या मुलीने पीडितेबाबत दोन दिवसांपूर्वी घडलेला प्रकार सांगितला. तसेच ४-५ दिवसांपासून आरोपी पप्पू शिंदे त्याचे मित्र पाठलाग करून घाणेरडे बोलत असल्याचे तिने सांगितले. 

ती (पीडिता) घाबरली असून तू तिला काही विचारू नको, असे मोठी मुलगी म्हणाली. त्यामुळे मी काही विचारले नाही. वाजता मी दोघींना चहा बिस्किटे दिली. त्यावेळी पीडितेने रात्री अंड्याची भाजी करण्याची मागणी केली. त्यावर मी त्यांना घरातला मसाला संपल्याचे सांगून आजोबांकडून मसाला घेऊन या, असे म्हणाले. त्यावर पीडिता मोठ्या बहिणीला अभ्यास करायला सांगून एकटीच सायकलवर मसाला आणायला गेली. 

अर्धा तास होऊनही ती परत आल्यामुळे मी मोठ्या मुलीला आजोबांना फोन लावायला सांगितला. फोन लागल्याने आम्ही दोघी मोबाइल टॉर्च सोबत घेऊन तिला शोधायला निघालो. रस्त्यात पुतण्या त्याचे मित्र भेटले. त्यांनी मला काकू कुठे चालल्या, असे विचारले. त्यावर मी त्याला पीडितेला शोधत असल्याचे सांगून ती दिसल्यास घरी पाठव, असे म्हणाले. तेही तिला शोधू लागले. काही अंतरावरच पीडितेची सायकल पडलेली दिसली. बॅटरीच्या उजेडात लिंबाच्या झाडाखाली पप्पू शिंदे दिसला. पुतण्याने त्याला हटकताच तो गावाच्या दिशेने पळाला. पुतण्या त्याचे मित्रही पप्प्याच्या मागे पळाले. 

लिंबाच्या झाडाखाली पीडिता विवस्त्रावस्थेत निपचित पडलेली होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. त्यामुळे आम्ही घाबरून रडू लागलो. काही वेळाने चुलत सासू आल्या. त्यांनी पीडितेच्या अंगावर साडी टाकली. नंतर पीडितेला घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो. 

दवाखान्यात रडून रडून मी बेशुद्ध पडले. तेथून पुढे आपल्याला काहीच आठवत नसल्याचे आई न्यायालयात म्हणाली. दुसऱ्या दिवशी पीडितेवर अंत्यसंस्कार झाले. १५ जुलैला पोलिसांनी आपला जबाब नोंदवल्याचे त्या म्हणाल्या. मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्यासह संतोष भवाळ नितीन भैलुमे यांनाही त्यांनी न्यायालयात ओळखले. भवाळला ओळखताना त्यांनी त्याला ‘टोणगा’ संबोधले. 
 
अनर्थ होईल याची कल्पना नव्हती 
पीडितेला धमकी दिली असूनही तिला एकटीला का पाठवले, असा सवाल आरोपीच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी विचारला. त्यावर दिवस मावळतीला आलेला होता. अन् आजच असा अनर्थ ओढवेल, याची कल्पना केली नव्हती, असे उत्तर पीडितेच्या आईने दिले. तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी पुण्यात राहतो, असे अॅड. आहेर म्हणताच त्यांनी तो कोपर्डीतच राहत असल्याचे ठासून सांगितले. 

त्यांना कसे सांगणार 
पीडितेची छेडछाड करून धमकी दिल्याचा प्रकार पतीला का सांगितला नाही? असे विचारल्यावर, ते शेतावर गेलेले होते, असे आईने उलटतपासणीत सांगितले. हा प्रकार तुम्ही इतर नातेवाईकांना का सांगितला नाही, असा प्रश्न अॅड. खोपडे यांनी विचारला. त्यावर ‘हा घरातला विषय आहे. नातेवाईकांना कसे सांगणार’ असे त्या म्हणाल्या. उलटतपासणीत त्यांनी एकेका प्रश्नाचे धीटपणे उत्तर दिले. 

ठरावाचे माहीत नाही 
मुख्य आरोपीच्या वतीने सरकारने नियुक्त केलेले अॅड. योहान मकासरे यांनी उलटतपासणी घेतली. त्यांनी नातेसंबंध, फिर्यादी पुतण्या, त्याचे मित्र यांच्याविषयी विचारले. अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी आजोबांचा मद्यविक्रीचा व्यवसाय होता का, असे विचारले. त्यावर आईने नव्हता म्हणून सांगितले. गावात दारुबंदी ठराव झाल्याबद्दलही आपल्याला काहीच सांगता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. 

अन् वातावरण भावूक झाले... 
घटनेच्या दिवशी पीडितेच्या अंगावर असलेल्या कपड्यांचे वर्णन आईने साक्षीमध्ये केले. हे सर्व कपडे न्यायालयात ओळखताना त्यांना अश्रू अनावर होऊन त्या ढसाढसा रडायला लागल्या. त्यामुळे जरा वेळेपुरती त्यांची साक्ष थांबवण्यात आली. काही वेळ खुर्चीवर बसून त्या पुन्हा साक्ष द्यायला उभ्या राहिल्या. या प्रसंगामुळे वातावरण भावनिक झाले होते. मुलीच्या आवडीनिवडी सांगताना त्या ओल्या डोळ्यांनी, रडवेल्या कातर स्वरात बोलत होत्या. 
 
बातम्या आणखी आहेत...