आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटला: पूर्वग्रहदूषित पद्धतीने हत्याकांडाचा तपास, आरोपी वकिलांचा युक्तिवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कोपर्डी येथील निर्घृण हत्याकांडानंतर राजकीय सामाजिक तणाव निर्माण झाला होता. म्हणूनच कर्जतच्या पोलिस निरीक्षकांकडून गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. मात्र, त्यांनी पूर्वग्रहदूषित मनाने बेकायदेशीर पद्धतीने तपास केला.
 
आरोपींची संख्या वाढवण्यात आली. त्यांच्याविरुद्ध खोटे पुरावे तयार करण्यात आले. तपासाच्या प्रगतीपासून वरिष्ठ अधिकारीही अनभिज्ञ होते, असा युक्तिवाद आरोपी संतोष भवाळच्या वतीने अॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी केला. दोषारोपपत्रातील पुरावे खोटे असल्याचे स्पष्ट करत त्यांनी निरपराधांना न्याय देण्याची विनंती केली. 
 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याचा अंतिम युक्तिवाद सुरू आहे. अॅड. खोपडे यांनी बुधवारी उर्वरित युक्तिवाद पूर्ण केला. त्यांना अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी सहकार्य केले. दंतवैद्यांनी आपल्या साक्षीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या आरोपीविरुद्ध कोणतेही वैद्यकीय पुरावे नसल्याचे सांगितले होते. कर्जत पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देणारा पहिला फोन लँडलाइनवर आला होता. त्यावर कॉलर आयडी नसूनही स्टेशन डायरीच्या नोंदीत माहिती देणाऱ्याचा मोबाइल नंबर कसा काय आला, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. 
 
प्रत्यक्षात फिर्यादीनुसार पीडित मुलीची तीन नावे समोर आली आहेत. पण स्टेशन डायरीतील पहिल्याच नोंदीत पीडितेचे नाव वेगळेच आहे. त्यामुळे मृत्यू झालेली मुलगी नक्की कोण? असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला. साक्षीदारांनी पीडितेच्या मृत्यूचा नेमका वेळही सांगितला नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण समोर आले, तरी मूळ घटनाच संशयास्पद नसल्याचे त्या म्हणाल्या. कुळधरण रुग्णालयात नेताना नेल्यानंतर तिच्या अंगावर असलेले कपडे जप्त झाले नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 
 
स्टेशन डायरीत नोंद आहे, तसे सीसीटीएनएस प्रणालीचीही शहानिशा करावी. ही प्रणाली प्रत्येक नोंदीचे, घटनेचे पारदर्शक स्वरूप असते. पोलिस मॅन्युअलनुसार स्टेशन डायरी अद्ययावत असणे बंधनकारक आहे. मात्र, या घटनेत तसे झाले नाही. २५ वर्षांहून अधिक काळ सेवेत असलेल्या पोलिस निरीक्षकांकडून असे होणे, आश्चर्यजनक आहे. दोषारोपपत्रासोबत जी स्टेशन डायरी दिली आहे, त्यावर पोलिस अधीक्षकांचे शिक्केच नाहीत. त्यावरून हा पुरावा बेकायदेशीर आहे, असे खोपडे म्हणाल्या. 
 
दुचाकी जळिताकडे दुर्लक्ष 
घटनास्थळसंवेदनशील असल्याने पोलिसांनी परिसर सुरक्षित करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाचारण केले. पण, हे पथक आल्याचा काहीच उल्लेख नाही. त्यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रियाच संशयास्पद अाहे. घटनास्थळी रक्त पडलेली माती, जळालेल्या दुचाकीची राखही जप्त नाही. पत्रव्यवहाराचे रजिस्टर शंकास्पद अाहे. एका पत्रावर तर दोन हजारांपुढील अनुक्रमांक आहे. एकाच दिवसात एकाच पोलिस ठाण्यातून दोन हजार पत्र कुणाला गेली, असे खोपडे यांनी म्हणाल्या. 
 
आधीचठरला निकाल 
आरोपीचीमोटारसायकल जळाल्याची स्टेशन डायरीला काहीच नोंद नाही. गुन्ह्यातील महत्त्वाचा पुरावा नष्ट हाेऊनही पोलिसांनी कोणावरच गुन्हा नोंदवला नाही. उपअधीक्षकांचे आदेश नसूनही आरोपीची घरझडती घेतली. भवाळ कोपर्डीचा असल्याचा ठोस पुरावा नाही. ऐनवेळी दिलेला सातबारा उताराही खोटा नसेल कशावरून, असे खोपडे म्हणाल्या. दोषारोपपत्र जाण्यापूर्वीच राजकीय नेत्यांनी काय शिक्षा द्यायची, याबाबत जाहीर विधाने केली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
 
त्या सीडीज पुरावाच 
दोषारोपपत्रदाखल होण्यापूर्वीच सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली, ही बाब अाक्षेपार्ह आहे. बचाव पक्षाने न्यायालयात दिलेल्या सीडी या पुरावाच आहेत. इलेक्ट्रॉनिक पुरावा असल्याचे प्रमाणपत्रही त्यासोबत दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद सुरू केला. आता त्यांचा उर्वरित युक्तिवाद नोव्हेंबरला होणार आहे. 
 
मंत्री आरोपी होईल? 
फिर्यादीनेरुग्णालयात डॉक्टरला माहिती दिल्याने केसपेपरमध्ये मुख्य आरोपीचा उल्लेख केलेला अाहे. ही बाबच हास्यास्पद आहे, असे अॅड. प्रकाश आहेर म्हणाले, जर फिर्यादीने एखाद्या मंत्र्याचे नाव घेतले असते, तर पोलिसांनी काय मंत्र्यालाही आरोपी केले असते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार पक्षाने पुराव्यादाखल ऐनवेळी पंचाग सादर केले. त्याची खिल्ली उडवताना आहेर म्हणाले, आपल्याकडे हवामान खात्याचे अंदाज खरे ठरत नाहीत. मग पंचांगावर कसा विश्वास ठेवायचा? 
 
आरुषी तलवारशी तुलना 
गुन्ह्यातपॉस्कोचे कलम आहे. मात्र, वयाचा पुरावाच दिलेला नाही. गंभीर गुन्हा असूनही पोलिसांनी निष्काळजी तपास केला, असा आरोप अॅड. खोपडे यांनी केला. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असून बहुचर्चित ‘आरुषी तलवार मर्डर केस’शी तुलना करण्यात आली. अशा केसमध्ये काल्पनिक कथानिक रचून गुन्हा शाबीत करण्याचा प्रयत्न केला जातो. पण पुढे त्याचे काय होते, हे दर्शवण्यासाठी खोपडेंनी तलवार केसचे निकालपत्र सादर केले. 
 
एसपी तेथे गेलेच नाही 
कोपर्डीतीलघटना गंभीर संवेदनशील होती. अशा वेळी पोलिस अधीक्षक उपअधीक्षकांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अपेक्षित होते. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक (त्यावेळी सौरभ त्रिपाठी हे एसपी होते) घटनास्थळी गेलेच नाही. तपासी अधिकाऱ्यांनीही दैनंदिन तपासाचा अहवाल वरिष्ठांना दिला नाही. यावरून संवेदनशील घटनेचा तपास किती निष्कळजीपणे झाला, हे दिसून येते, असे अॅड. खोपडे म्हणाल्या. 
 
नार्कोचे काय झाले? 
अटकेतअसलेल्या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासादरम्यान मुंबईला नेले होते. तेथे खारघरला एक दिवस ठेवले. तेथे आराेपींची नार्को चाचणी केल्याचा दावा अॅड. आहेर यांनी केला. मात्र, नार्को चाचणीत काही सिद्ध झाल्याने तो अहवालच न्यायालयात दिला नाही, असेही ते म्हणाले. खटल्यातील सरकारी साक्षीदार वगळता बहुतांश जण पीडितेचे नातेवाईक आहेत. म्हणून त्यांनी न्यायालयात खोट्या साक्षी दिल्या, असेही ते म्हणाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...