आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या दिवसापासूनच करत होतो कोपर्डीच्या प्रकरणाचे ट्रॅकिंग, बचाव पक्षाचे साक्षीदार चव्हाण यांची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पेपरमध्ये कोपर्डी घटनेची पहिली बातमी वाचल्यापासून आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो. विविध माध्यमांतून हे प्रकरण ‘ट्रॅक’ करत होतो. कोपर्डीतील पीडितेच्या कुटुंबीयांना कधीही भेटलो नाही. मात्र, आरोपी संतोष भवाळचा भाऊ मला येऊन भेटल्यापासून त्याच्या संपर्कात आहोत. सरकारी वकील उज्ज्वल निकम कोपर्डी खटल्याबद्दल माहितीच्या अधिकारात माहितीही मिळवली होती, अशी कबुली बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यांची अर्धवट राहिलेली उलट तपासणी शनिवारी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तब्बल साडेतीन तास त्यांची उलट तपासणी घेतली. 
 
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर कोपर्डी खटल्याची सुनावणी सुरू आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता चव्हाण यांची उर्वरित उलट तपासणी सुरू झाली. गेल्या वेळी दाखवलेल्या एका वृत्तवाहिनीच्या व्हिडिओत अॅड. निकम यांनी ‘मराठा’ हा शब्द कोठेही उच्चारलेला नाही, मराठा मोर्चाच्या मागण्यांचाही त्यात उल्लेख नाही. मात्र व्हिडिओत ‘मराठा मोर्चे’ हे सबटायटल कोणी घुसवले, हे माहिती नसल्याचे चव्हाण म्हणाले. बहुजन क्रांती मोर्चाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कामगार नेते अनंत लोखंडे यांना ओळखत असल्याची कबुली त्यांनी दिली. 
 
नंतर भय्युजी महाराज यांनी अॅड. निकम यांच्या जळगावातील घरी दिलेल्या भेटीचा, कोपर्डी प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या निवेदनाचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा, असे तीन व्हिडिओ न्यायालयात दाखवण्यात आले. त्या अनुषंगाने अॅड. निकम यांनी चव्हाणांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या तिन्ही व्हिडिओत अॅड. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार केल्याचा कोठेही उल्लेख नसल्याचे, व्हिडिओंच्या सत्यतेबद्दल कोणतीही शहानिशा केली नसल्याचे चव्हाण यांनी कबूल केले. 
 
कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाच्या वकिलांनी सादर केलेले व्हिडिओ संपादित केलेले आहेत. ते खरे असल्याचे काेणतेही प्रमाणपत्र बचाव पक्षाने सादर केले नाही. किंवा ते मिळवलेही नाहीत, सुनावणीला गैरहजर राहताना बचाव पक्षाचे साक्षीदार रवींद्र चव्हाण यांनी न्यायालयात खोटे कारण सांगितले, आजही ते न्यायालयात खोटी साक्ष देत असल्याचे आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले, तर चव्हाण यांनी त्यांचा इन्कार केला. या खटल्यात दोन्ही पक्षांचे साक्षीपुरावे पूर्ण झाले आहेत. पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार असून अॅड. निकम हे सरकार पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करतील. 
 
‘व्हिडिओ’ आणि ‘स्क्रीप्ट’मध्ये तफावत 
बचावपक्षाने न्यायालयात दिलेल्या चार व्हिडिओंपैकी दोन व्हिडिओंचे स्क्रीप्ट (लिखित रुपांतर) सोबत जोडले होते. त्यात प्रचंड तफावत असल्याचेही अॅड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. व्हिडिओत नसलेली वाक्ये, संवाद संदर्भ लिखित मसुद्यात जाणीवपूर्वक घुसवले असल्याचा आरोप अॅड. निकम यांनी केला. ही तफावत कशामुळे झाली, असे विचारले असता ती मुद्रित लेखकाची चूक असू शकते, असे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले. 
 
केवळ आकस द्वेष 
बचाव पक्षाने महत्त्वाचे पुरावे म्हणून सादर केलेले व्हिडिओ सत्य असल्याचे काेणतेही प्रमाणपत्र नाही. या व्हिडिओंची संबंधित वाहिन्यांकडून, विश्वासार्ह यंत्रणेकडून शहानिशा केलेली नाही. तीन व्हिडिओंमध्ये केवळ उज्ज्वल निकम यांचा नामोल्लेख आहे. त्यामुळे अॅड. निकम यांच्याबद्दल असलेला आकस द्वेष, यापोटीच बचाव पक्षाच्या साक्षीदाराने व्हिडिओ सादर केले. ते संपादित केलेले बनावट असल्याचा आरोप अॅड. निकम यांनी केला, तर चव्हाणांनी त्यांचा इन्कार केला. 
 
‘खैरलांजी’ रिपोर्ट 
खैरलांजी येथे दलित हत्याकांड झाले, त्यावेळी मी बार्टी संस्थेत डायरेक्टर होतो. त्या घटनेबद्दल मी शासनाला दोन अहवाल दिले. खैरलांजीला भेटही दिली होती, अशी कबुली रवींद्र चव्हाण यांनी दिली. खैरलांजी खटला निकम यांनी चालवला. त्यात आरोपींना आधी फाशी झाली. पण हायकोर्टात गेल्यानंतर आरोपींची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित झाल्याचे नंतर पेपरात वाचले, असेही चव्हाण यांनी नमूद केले. हायकोर्टात निकम हे हजर झाले नाहीत, म्हणून त्यांच्यावर असलेल्या आकसापोटीच कोपर्डी खटल्यात पुरावे गोळा केले, हे मात्र चुकीचे अाहे, असे चव्हाण म्हणाले. 
 
सारखे म्हणजे ते नव्हे 
मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांच्या तोंडी अॅड. निकम यांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच गुन्ह्याचे दोषारोपपत्र बनवले, असे बचाव पक्षाने अर्जात म्हटले होते. पण, वारंवार व्हिडिओ पाहूनही त्यात निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दोषारोपपत्र तयार केल्याचा कोठेही उल्लेख दिसला नाही. रवींद्र चव्हाणांनाही तो दाखवता आला नाही. ‘अॅड. निकमसारखे’ वकील नेमू, असा उल्लेख मात्र होता. पण, निकमांसारखे म्हणजे निकम नव्हेत, असे स्पष्टीकरण सरकार पक्षातर्फे देण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...