आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी खटला: मुख्य आरोपीच्या घरात अश्लील सीडी, मोबाईलवर सापडला रक्ताचा डाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोपर्डी(ता. कर्जत) खटल्यातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या घरातून पोलिसांनी अश्लील सीडी जप्त केल्या. घरात सापडलेल्या त्याच्या मोबाइलवर रक्ताचा डाग होता, अशी माहिती घरझडतीच्या वेळी उपस्थित असलेल्या पंचाने दिली. 

कोपर्डी खटल्याची नियमित सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू झाली. सोमवारी तिघांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम काम पहात आहेत. चार दिवस या खटल्याचे कामकाज चालणार आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने टीव्हीएस दुचाकी जेथून घेतली, त्या दुकानाचा व्यवस्थापक नामदेव ताेरडमल याची साक्ष नोंदवण्यात आली. मालकाने सांगितल्यानंतर ४५ हजार रुपये घेऊन शिंदेला मोटारसायकल दिली, असे तो म्हणाला. उरलेली रक्कम शिंदे काही दिवसांनी देणार होता. त्यामुळे त्याला सेल नोट दिलेली नव्हती, असेही त्याने सांगितले. पंचनाम्यात जळालेल्या अवस्थेत ही दुचाकी ओळखली. मुख्य आरोपीसह मोटारसायकल त्यावरील इंजिन नंबरही त्याने कोर्टात ओळखला. 

मुख्य आरोपीच्या वतीने नियुक्त वकील योहान मकासरे यांनी उलटतपासणी घेतली. मोटारसायकल खरेदी पावतीत बहुतांश रकाने भरले नसल्याचे समोर आले. मोटारसायकलची विमा पावतीही केली नसल्याचे निष्पन्न झाले. अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी मॅनेजर कामाला असलेल्या दुकानाची कागदपत्रे मागवली. न्यायालयाने ती दोन दिवसांत हजर करण्याच्या सूचना मॅनेजरला केल्या आहेत. नंतर आरोपी जितेंद्र शिंदेच्या घराच्या झडतीच्या वेळचे पंच तात्या सूर्यवंशी यांची साक्ष झाली. 

आपल्यासमक्ष पोलिसांनी आरोपी शिंदे याच्या घराची झडती घेतली. तपासणीत शोकेसच्या ड्रॉवरमध्ये एक कॅरिबॅग सापडली. त्यामध्ये आठ सीडी होत्या. त्यापैकी काहींवर अश्लील छायाचित्रे होती. एक मोबाइलही सापडला. त्याला प्लास्टिकचे कव्हर होते. त्यावर रक्ताचा एक डाग होता, असे सूर्यवंशी यांनी साक्षीत सांगितले. न्यायालयात हे साहित्य दाखवल्यानंतर त्यांनी ते ओळखलेही. त्यानेही न्यायालयात मुख्य आरोपी शिंदे याला ओळखले. नंतर घटनास्थळाचे फोटो काढणाऱ्या युवकाची साक्ष नोंदवण्यात आली. 

मेमरीकार्ड स्वीकारले 
फोटोग्राफरचीसाक्ष झाल्यानंतर पुरावा असलेले एक मेमरी कार्ड न्यायालयात सादर करण्यात आले. याला तिन्ही आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. खटल्याचे दोषारोपपत्र सादर केले, त्यावेळीच हे कार्ड द्यायला हवे होते. आता ते सादर करता येणार नाही, असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यानंतर विशेष सरकारी वकील निकम यांनी सर्वोच्च न्यायालयातील एका सायटेशनच दाखला दिला. न्यायाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्र केव्हाही खटल्यात दाखल करु शकतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. अॅड. उज्वल निकम यांचा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने संबंधित मेमरी कार्ड न्यायालयात सादर करण्याची परवानगी सरकारी पक्षाला दिली. 

साक्षीदारांना कोर्टाबाहेर काढले 
खटल्याचे कामकाज सुरू असताना दोन साक्षीदार आगंतुक म्हणून न्यायालयात एका कोपऱ्याला उपस्थित होते. ही बाब लक्षात येताच तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याचे वकील अॅड. प्रकाश आहेर यांनी ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर त्यांची चाैकशी करुन त्यांना बाहेर जायला सांगण्यात आले. खटल्याचे कामकाज सुरू असताना इतर साक्षीदार उपस्थित आहेत का, याबाबत पोलिसांनी दक्ष रहावे, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या. 
 
नितीन भैलुमेला द्यायचीय परीक्षा 
तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याला पदवीची परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे त्याला कोठडीत अभ्यासाची पुस्तके दिली जावीत, असा विनंती अर्ज त्याचे वकील अॅड. प्रकाश आहेर यांनी न्यायालयात केला. त्याला माहितीच्या अधिकाराची पुस्तके अर्ज द्यावेत, असेही अर्जात म्हटले आहे. या अर्जावर सरकार पक्षाने म्हणणे सादर केले. कारागृहाच्या नियमानुसार त्याला आवश्यक पुस्तके देण्यास हरकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्जावर मंगळवारी सुनावणी होईल. 
 
पुढील स्लाइडवर पाहा काय आहे प्रकरण..?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...