आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी बलात्कार: पीडितेच्या आजीने आरोपींना ओळखले, साक्षीदार तयार केल्याचा वकिलांचा आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्जत तालुक्यातील कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत मंगळवारी पीडितेच्या चुलत आजीची साक्ष पूर्ण झाली. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपीचे साथीदार संतोष भवाळ नितीन भैलुमे यांना आपण पाहिले होते, त्यांना हटकलेही होते. आम्ही गावात गेलो होतो, असे सांगून ते सटकले नंतर बाभळीच्या झाडाखाली उभे राहिले, असे चुलत आजीने सांगितले. न्यायालयात हजर असलेल्या आरोपींनाही त्यांनी ओळखले. त्यांची उलटतपासणीही पूर्ण झाली. 

आजींनी सांगितले की, शेळी घरी आणल्यानंतर काही वेळाने शेजारच्या शेतातून ओरडण्याचा आवाज आला. धावत जाऊन पाहिले, तर तेथे पीडितेचा मृतदेह तिच्या आईच्या मांडीवर होता. पीडितेची आई रडत होती. तिला चक्कर आल्याने घरी नेले पीडितेला उपचारांसाठी दवाखान्यात नेले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उलटतपासणीत आरोपीच्या वकिलांनी केलेल्या आक्षेप आरोपांचाही त्यांनी इन्कार केला. 

सोमवारी अपूर्ण राहिलेली छायाचित्रकाराची उलट तपासणी आधी पूर्ण झाली. आरोपीच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्याने आपण सरकारी फोटोग्राफर नसल्याचे, तसे शिक्षणही घेतले नसल्याचे कबूल केले. घटनास्थळाची छायाचित्रे घेतल्याबद्दलच्या कामाचे एक हजार रुपये मिळाल्यानंतर तशी पावती दिली नसल्याचे सांगितले. सोमवारी आरोपींच्या वतीने करण्यात आलेल्या तीन अर्जांवर न्यायालयात सुनावणी झाली. 

सरकार पक्षाचे सर्व पुरावे अगोदरच न्यायालयाच्या नोंदवहीत घ्यावेत, अशा मागणीचा अर्ज आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तो फेटाळला. सरकार पक्षाने सोमवारी सादर केलेली छायाचित्रे चित्रफिती पुराव्याच्या यादीत नसल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सर्व पुरावे न्यायालयात रजिस्टरवर आणून त्याच्या सत्यप्रती मिळाव्यात, अशी मागणीही केली होती. 

छायाचित्र चित्रफिती असलेला लिफाफा न्यायालयात सादर असल्याचे नोंदवहीत नमूद आहे, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच आरोपींच्या वकिलांचा अर्ज म्हणजे न्यायालयीन कामकाजावर अविश्वास दाखवणे होईल, असे म्हणत आरोपींच्या वकिलांचा अर्ज फेटाळला. याशिवाय तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी नितीन भैलुमे याला शैक्षणिक अभ्यासासाठी हव्या असलेल्या पुस्तकांच्या मागणीचा अर्ज सध्या तात्पुरता प्रलंबित ठेवण्यात आला आहे.या खटल्याची सुनावणी ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने न्यायालयात उपस्थित असतात. 

सरकारी वकिलांवर आक्षेप 
विशेषसरकारी वकील उज्वल निकम यांनी खटल्यातील सर्व साक्षीदारांची न्यायालयात कसे बोलायचे याची तयारी करुन घेतली आहे, असा आरोप आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी केला. पीडितेच्या आजीची उलटतपासणी घेताना तुम्ही भय्युजी महाराजांच्या भक्त आहात. उज्वल निकम तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले होते का, अशी विचारणा करण्यात आली. मात्र, पीडितेच्या आजीने या आक्षेपांचा इन्कार केला. आपण खोटे बोलत नसल्याचेही नमूद केले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे प्रकरण..?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...